न्यूयॉर्कमधील चीनच्या पोलीस स्टेशनसमोर अमेरिकेतील चीनवंशीयांची निदर्शने

अमेरिकेतील चीनवंशीय न्यूयॉर्क – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने अमेरिकेत उभारलेली ‘चायनीज्‌‍ पोलीस स्टेशन्स’ वादात सापडली आहेत. दोन दिवसांपूर्वी न्यूयॉर्क शहरातील या पोलीस स्टेशनच्या बाहेर जोरदार निदर्शने पार पडली. अमेरिकेत स्थायिक झालेले आणि आश्रय घेतलेले चीनवंशिय या निदर्शनात सहभागी झाले होते. या पोलीस स्टेशन्सच्या माध्यमातून चीनची कम्युनिस्ट राजवट परदेशातील चीनवंशियांवर हेरगिरी करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘एफबीआय’ने याच इमारतीत बेकायदेशीररित्या पोलिसांची भर्ती केल्याचा ठपका ठेवून कारवाई केली होती.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन भागात 107 ईस्ट ब्रॉडवे येथे ‘चायनाटाऊन’ इमारत आहे. या इमारतीमध्ये चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने ‘चायनीज्‌‍ पोलीस स्टेशन’ उभारले आहे. गेल्या वर्षीपर्यंत अमेरिकेत आपले सिक्रेट पोलीस स्टेशन नसल्याचा दावा चीनच्या दूतावासाने केला होता. पण अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने कारवाई केल्यानंतर चीनचे पितळ उघडे पडले होते. चीनच्या दूतावासाने या कारवाईवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. मात्र चायनाटाऊनच्या इमारतीत चिनी यंत्रणांनी बेकायदेशीररित्या पोलीस भर्ती केल्याचा ठपका ठेवूनएफबीआयने ही कारवाई केली होती. स्थानिक व्यावसायिकाच्या सहाय्याने चीनने न्यूयॉर्कमध्ये हे पोलीस स्टेशन उभारले होते. हे प्रकरण शांत होत असताना, दोन दिवसांपूर्वी चायनाटाऊन इमारतीतील चीनच्या या सिक्रेट पोलीस स्टेशनबाहेर 60 हून अधिक जणांनी निदर्शने केली. यामध्ये अमेरिकन संसदेचे सदस्य तसेच चीनवंशिय आणि तिबेटींचा समावेश होता. बेकायदेशीररित्या उभारलेल्या या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चीनची कम्युनिस्ट राजवट परदेशातील चीनवंशियांचा छळ व त्यांच्यावर हेरगिरी करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात जाहीरपणे टीका करणाऱ्यांवर चीनचे हे पोलीस स्टेशन बेकायदेशीररित्या कारवाई करीत असल्याचा ठपका चीनवंशिय निदर्शकांनी ठेवला.

अमेरिकन प्रतिनिधीगृहातील ‘चायना सिलेक्ट कमिटी’चे अध्यक्ष माईक गॅलाघर यांनी या निदर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना मॅनहॅटन भागातील चीनच्या या सिक्रेट पोलीस स्टेशनच्या स्थापनेवरच संताप व्यक्त केला. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीशी संलग्न असलेले सदर सिक्रेट पोलीस स्टेशन पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप गॅलाघर यांनी केला. जगभरात असे 100 हून अधिक सिक्रेट पोलीस स्टेशन असून अमेरिकेतच चार पोलीस स्टेशन्स असल्याची माहिती गॅलाघर यांनी दिली. अमेरिकेच्या प्रशासनाने या बेकायदेशीर पोलीस स्टेशन्सच्या निर्मितीला परवानगी दिलीच कशी? असा सवाल गॅलाघर यांनी केला आहे.

तर अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या अन्य दोन सदस्यांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे हे पोलीस स्टेशन्स अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असून बायडेन प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. स्पेनच्या मानवाधिकार संघटनेने देखील चीनच्या या सिक्रेट पोलीस स्टेशनच्या माध्यमातून परदेशातील चीनवंशियांचे अधिकार पायदळी तुडविले जात असल्याचे सांगून त्यावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, चीनच्या या सिक्रेट पोलीस स्टेशनच्या विरोधात आरडाओरडा सुरू असताना बायडेन प्रशासन मात्र या अत्यंत संवेदनशील विषयावर प्रतिक्रिया देण्याचे टाळत आहे. गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा न्यूयॉर्क शहरातील सिक्रेट चायनीज्‌‍ पोलीस स्टेशन चर्चेत आले आहे.

 

leave a reply