नौदलाच्या स्टेल्थ विनाशिकेवरुन सुपरसोनिक ब्रह्मोसची चाचणी

नवी दिल्ली – रविवारी भारताने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नौदल आवृत्तीची चाचणी घेतली. स्वदेशी बनावटीची स्टेल्थ विनाशिका ‘आयएनएस चेन्नई’मधून हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले व ब्रह्मोसने अरबी समुद्रातील आपल्या लक्ष्यावर अचूक निशाणा साधला. स्टेल्थ क्षमतेमुळे ‘आयएनएस चेन्नई’ला शत्रूची रडार यंत्रणाही पकडू शकत नाही, तर ब्रह्मोसचे सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्र ध्वनीच्या तीनपट वेगाने शत्रूच्या ठिकाणावर वार करू शकते. त्यामुळे ब्रह्मोसची ही चाचणी भेदक मानली जात आहे. गेल्या दोन आठवड्यात ब्रह्मोसची ही दुसरी चाचणी असून या क्षेपणास्त्राची लष्कराची आवृत्ती याआधीच लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ तैनात करण्यात आली आहे.

भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ (डीआरडीओ) आणि रशियाच्या एरोस्पेस कंपनीने संयुक्तरित्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. सदर क्षेपणास्त्र लष्कराच्या मोबाईल लाँचर तसेच नौदलाच्या विनाशिका किंवा पाणबुडी व वायुसेनेच्या लढाऊ विमानातूनही प्रक्षेपित केले जाते. अशा या ‘ब्रह्मोस’च्या ४०० किलोमीटर पर्यंत मारा करू शकणार्‍या नौदल आवृत्तीची रविवारी चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान २.८ मॅक अर्थात ध्वनीच्या जवळपास तीनपट वेगाने प्रवास करणार्‍या सुपरसोनिक क्रूझ ब्रह्मोसने अरबी समुद्रातील आपले लक्ष्य अचूकरित्या भेदले असून शत्रूच्या पाणबुड्या, विनाशिकेला जलसमाधी देण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.

तर ‘आयएनएस चेन्नई’ ही विनाशिका स्टेल्थ तंत्रज्ञानाने सज्ज असून शत्रूची रडार यंत्रणाही भारताच्या या विनाशिकेला पकडू शकत नाहीत. म्हणून ‘आयएनएस चेन्नई’वरुन सुपरसोनिक ब्रह्मोसची ही चाचणी भारतीय नौदलाला अधिक सामर्थ्यवान बनविणारी ठरली आहे. ‘डीआरडीओ’ आणि भारतीय संरक्षणदलांनी गेल्या दोन आठवड्यात ब्रह्मोसची दुसर्‍यांदा चाचणी घेतली आहे. याआधी ३० सप्टेंबर रोजी ओडीशाच्या चांदिपुरा येथील प्रक्षेपण तळावरुन ब्रह्मोसची मारक क्षमता वाढविणारी चाचणी घेतली होती.

ब्रह्मोसची २९० किलोमीटर पर्यंत मारा करणारी लष्करी आवृत्ती याआधीच लडाख व अरुणाचल प्रदेशच्या लष्करी तळांवर तैनात करण्यात आली आहे. तर लेह-लडाखच्या हवाईतळावर तैनात वायुसेनेतील सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमाने देखील ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत. ही क्षेपणास्त्रे शत्रूच्या सीमेतील दहशतवाद्यांची ठिकाणे, बंकर्स, कमांड-कंट्रोल सेंटर्स आणि विमानवाहू युद्धनौका देखील नष्ट करू शकतात. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सदर क्षेपणास्त्राची मारक क्षमता वाढविणारी सदर चाचणी व तैनाती चीनला इशारा देणारी ठरली होती.

गेल्या ४० दिवसांच्या कालावधीत ‘डीआरडीओ’ आणि भारतीय संरक्षणदलांनी ११ क्षेपणास्त्रांच्या १२ चाचण्या घेतल्या आहेत. यामध्ये लष्करासाठीच्या रणगाडाभेदी लेझर गायडेड क्षेपणास्त्रापासून, अण्वस्त्रवाहू शौर्य व पृथ्वी-२, वायुसेनेसाठीच्या अभ्यास ड्रोन, ‘एचएसटीडीव्ही’ हायपरसोनिक क्षेपणास्त्र, शत्रूची रडार यंत्रणा गारद करणारे ‘रुद्रम-१’ आणि नौदलासाठीच्या पाणबुडीविरोधी युद्धासाठी वापरल्या जाणार्‍या ‘स्मार्ट’ टॉर्पेडो व ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त भारतीय वायुसेनेच्या सुखोई-३० एमकेआय, जग्वार, मिराज-२००० या लढाऊ विमानांनी तर ग्लोबमास्टर, हर्क्युलिस, आयएल-७६, चिनूक या अजवड मालवाहतूक करणार्‍या विमाने व हेलिकॉप्टर्सनी दिवस-रात्र उड्डाणांचे प्रमाण वाढविले आहे. भारतीय नौदलाने या कालावधीत अमेरिका, जपान या देशांच्या युद्धनौकांबरोबर हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरात युद्धसरावांचे आयोजनही केले होते.

leave a reply