चिनी बँका ‘सीपीईसी’तील गुंतवणूक रोखण्याच्या तयारीत

इस्लामाबाद – चीन आपला सच्चा मित्रदेश असल्याचे जाहीर करुन सौदी अरेबियाबरोबरच्या संबंधातून फारकत घेणार्‍या पाकिस्तानला चीननेच जोरदार झटका दिला. चीनच्या वित्तसंस्था आणि बँका ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ (सीपीईसी) प्रकल्पात गुंतवणूक करण्यास तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानातील अस्थैर्य यासाठी जबाबदार असल्याचे कारण चिनी बँका देत आहेत. तर पाकिस्तानचे नेते चीनसमोर गयावया करीत असल्याची टीका पाकिस्तानी माध्यमे करू लागली आहेत. यामुळे पाकिस्तानी जनतेमध्ये इम्रान खान सरकार आणि चीनच्या विरोधातील असंतोष अधिकच खदखदू लागला आहे.

‘सीपीईसी’

गेल्या आठवड्यात सौदी अरेबियाने पाकिस्तानला आर्थिक सवलत आणि इंधनाचा पुरवठा नाकारल्यानंतर पाकिस्तानने चीनला आपला ‘ऑल वेदर फ्रेंड’ असल्याचे जाहीर केले होते. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी चीनला तातडीने भेट देऊन परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्याशी चर्चा केली होती. आपल्या या चीन दौर्‍याला फार मोठे यश मिळाल्याचे कुरेशी यांनी जाहीर केले होते. पण कुरेशी चीनच्या या दौर्‍यातून रिकाम्या हाताने मायदेशी परतल्याचे पाकिस्तानी माध्यमांनीच लक्षात आणून दिले होते. पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी यावर अधिक माहिती देण्याचे टाळले होते. पण कुरेशी यांच्या या चीन दौर्‍याचे तपशील हळुहळू समोर येत आहेत.

‘सीपीईसी’

पाकिस्तानातील ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ (सीपीईसी) प्रकल्पात गुंतवणूक करण्यास चीनच्या वित्तसंस्था आणि बँका तयार नसल्याचे दावे पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत. काही चिनी बँकांनी या प्रकल्पातील गुंतवणूक रोखण्याचे संकेत दिले आहेत. परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी आपल्या चीन दौर्‍यात यासंबंधी चिनी अधिकार्‍यांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानातील राजकीय अस्थैर्य चिनी बँकांच्या या भूमिकेसाठी जबाबदार असल्याचे कारण दिले जात आहे. इम्रान खान सरकारवर चिनी बँकांचा विश्वास उरला नसल्याचे काही पाकिस्तानी पत्रकार सांगत आहेत. तर पाकिस्तानात कुठल्याही क्षणी राजकीय उलथापालथ होऊ शकते म्हणून चिनी बँकांनी या प्रकल्पाचे सहाय्य रोखून धरल्याचे काही पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, पाकिस्तानी जनतेतही सीपीईसी प्रकल्पाबाबत कमालीची नाराजी पसरली आहे. या प्रकल्पाच्या आड चीनने पाकिस्तानचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप पाकिस्तानी जनता व माध्यमे करीत आहेत. यासाठी सीपीईसीशी संबंधित चिनी ऊर्जा प्रकल्पांनी केलेल्या ६२ कोटी डॉलर्सच्या गैरव्यवहाराचे दाखले दिले जात आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पात सहभागी असलेल्या चिनी कंत्राटी कामगारांकडून पाकिस्तानी जवान आणि नागरिकांवर होणार्‍या हल्ल्यांमुळेही पाकिस्तानी जनता तसेच जवानांमध्ये असंतोष खदखदत आहे. तर या प्रकल्पाचे समर्थन करणारे पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी परदेशात कोट्यावधीची मालमत्ता जमवून बसल्याचे आरोप पाकिस्तानी माध्यमांमधून होऊ लागले आहेत.

leave a reply