दहशतवाद्यांची निर्यात करणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

नवी दिल्ली – ‘दहशतवाद हा कर्करोगासारखा आहे. साथ जशी मानवाला घातक ठरते, तसाच दहशतवाद देखील मानवासाठी घातक आहे. काहीजण तर असे घातक ठरणारे दहशतवादी निर्यात करतात आणि असे चित्र भासवतात की ते दहशतवादाचे बळी ठरतात’, अशा प्रकारे नामोल्लेख न करता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला टोला लगावला. तर भारताने पाकिस्तानला पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सबळ व पुरेसे पुरावे दिले आहेत. निदान आतातरी पाकिस्ताने या दहशतवाद्यांवर कारवाई करावी, असे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी बजावले.

दहशतवाद्यांची निर्यात

दहशतवाद, महामारी आणि हवामान बदल हे जगासमोरील सर्वात मोठी आव्हाने आहेत. अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याच्या आधीही दहशतवाद होता. पण त्या हल्ल्यानंतर दहशतवादाचे भीषण परिणाम जाणवायला लागल्यानंतर सार्‍या जगाला या दहशतवादाचे संकट कळले, हे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्षात आणून दिले. त्याचबरोबर दहशतवादी निर्यात करणार्‍या देशावर आंतरराष्ट्रीय समुदायाने कारवाई करायला हवी, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ठणकावून सांगितले. दिल्लीच्या ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’मध्ये पार पडलेल्या व्याख्यानाला संबोधित करताना जयशंकर यांनी पाकिस्तानला इशारा दिला.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याचा सूत्रधार इब्राहिम दाऊद पाकिस्तानात असल्याचे मान्य केले होते. तसेच काही दहशतवाद्यांवर निर्बंध जारी केले होते. पण ‘फायनान्शियल अँक्शन टास्क फोर्स’च्या (एफएटीएफ) कारवाईने पाकिस्तानने ही कारवाई केल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले. ९/११ चा दहशतवादी हल्ला आणि ‘कोव्हिड-१९’ या साथीचा संबंध परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी परस्परांशी जोडला. प्रवासी विमानाला लक्ष्य करुन ९/११ सारखा दहशतवादी हल्ला घडविण्यात आला. तर घातक सांसर्गिक विषाणूचा वापर करुन जगाला गुडघ्यावर आणले गेले, असे महत्त्वपूर्ण विधान परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी यावेळी केले.

दरम्यान, शुक्रवारी परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पाकिस्तानाला पुलवामा हल्ल्यावरुन फटकारले. ‘राष्ट्रीय तपास संस्थे’ने (एनआयए) पुलवामा हल्ल्याविरोधात हजारो पानांचे आरोपपत्र दाखल केले. तसेच १९ दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले. यातील बरेचसे दहशतवादी पाकिस्तानचे आहेत. तसेच या हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये शिजल्याचे स्पष्ट झाले आहे. या संर्दभात पाकिस्तानला सबळ पुरावे दिले आहेत. निदान आतातरी पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा अनुराग श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानमध्ये मोकाट फिरत आहे, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले.

leave a reply