मलेशियाच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या सहा चिनी बोटी जप्त

- ६० चिनी नागरिकांना अटक

कौलालंपूर – मलेशियाच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या सहा चिनी बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. या बोटींबरोबरच ६० चिनी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या चिनी नागरिकांकडून ते आफ्रिकेला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र चीनकडून यापूर्वी साऊथ चायना सीमधील विविध भागांवर दावा सांगण्यासाठी तटरक्षक दल व ‘नेव्हल मिलिशिया’चा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मलेशियाने केलेली कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरते.

मलेशियाच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या सहा चिनी बोटी जप्त - ६० चिनी नागरिकांना अटकचीनच्या नौदलाने गेल्या काही महिन्यात ‘साऊथ चायना सी’ मधील आपल्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. चीनच्या युद्धनौकांबरोबरच तटरक्षक दलाची जहाजे व चीनच्या सशस्त्र मच्छिमार बोटिंची पथके (नेव्हल मिलिशिया) यांचा वावर वाढला आहे. चीनच्या युद्धनौका व बोटी या सागरी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या इतर देशांच्या बोटींना सातत्याने त्रास देत आहेत. एप्रिल महिन्यात चीनच्या गस्तीनौकांनी व्हिएतनामच्या मच्छिमार जहाजाला धडकही दिली होती. हॉंगकॉंगस्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने, चीनने साऊथ चायना सी सागरी क्षेत्रावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’ (एडीआयझेड) लागू करण्याची तयारी केली आहे, असे वृत्तही प्रसिद्ध केले होते.

मे महिन्यात चीनच्या जहाजांनी मलेशियाच्या सागरी क्षेत्रानजिक ठाण मांडले होते. या चिनी जहाजांना पिटाळण्यासाठी अमेरिकी नौदलाचे सहाय्य घेणे भाग पडले होते. त्यानंतरही चिनी जहाजांनी दोनदा मलेशियाच्या हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न केले होते. चीनच्या या वाढत्या कारवायांच्या विरोधात मलेशियाने थेट संयुक्त राष्ट्रसंघात आपली भूमिका स्पष्ट करणारे निवेदन दिले होते. त्यात साऊथ चायना सीवरील चीनचे सर्व दावे नाकारत असल्याचा रोखठोक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर मलेशियाने चिनी जहाजांवर केलेली कारवाई महत्त्वाची ठरते. चीनची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश यातून देण्यात आल्याचे मानले जाते.

मलेशियाच्या ‘मेरिटाईम एन्फोर्समेंट एजन्सी’ने शुक्रवारी जोहोर प्रांतानजिक केलेल्या कारवाईत सहा चिनी जहाजे ताब्यात घेतली. यावेळी सहा कॅप्टन्स व ५४ खलाशांनाही अटक करण्यात आली. ही सर्व जहाजे चीनच्या किंहुआंगदाओमध्ये नोंदणी झालेली असल्याचे समोर आले आहे. आफ्रिकेतील ‘मॉरिशानिया’मध्ये जात असल्याचा दावा चिनी कॅप्टन्सकडून करण्यात आला आहे. याबद्दल अधिक तपास सुरू असल्याची माहिती मलेशियन सूत्रांनी दिली.

गेल्या तीन वर्षात चीनच्या जहाजांनी तब्बल ९० वेळा मलेशियाच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. चीनच्या जहाजांची घुसखोरी व दादागिरीमुळे मलेशियाच्या मासेमारी उद्योगावर परिणाम झाल्याची तक्रारही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे चिनी जहाजांवर कारवाई करून मलेशियाने चीनला इशारा दिल्याचे दिसत आहे. मलेशियाची ही भूमिका गेल्या काही महिन्यात चीनच्या आक्रमकतेविरोधात ठाम धोरण स्वीकारणाऱ्या ‘आसियन’ देशांशी सुसंगत असल्याचे दिसते. मलेशियापूर्वी व्हिएतनाम, फिलिपाईन्स, थायलंड व इंडोनेशियानेही चीनच्या कारवायांना आव्हान देणारे निर्णय घेतले होते.

leave a reply