मणिपूरमध्ये शस्त्र आणि स्फोटकांचा साठा जप्त

बिशनपूर – आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी मणिपूरच्या बिशनपूरच्या नांबोल खथॉंग भागात संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. ईशान्य भारतातील अतिरेकी संघटना सुरक्षादलांवर हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याचा इशारा नुकताच देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर हा साठा पकडण्यात आला आहे.

नांबोल खथॉंग भागात बंदी घातलेल्या गटाच्या अतिरेक्यांच्या हालचालींबाबत सुरक्षादलांना माहिती मिळाली होती. त्यानंतर आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. सुरक्षादलांच्या जवानांनी या संपूर्ण परिसराला वेढा देऊन शोध मोहीम सुरु केली. यावेळी हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचे आसाम रायफल्सचे महानिरीक्षकांनी सांगितले.

या ठिकाणाहून एक एके-५६ रायफल आणि त्याचे मॅगझीन, दोन ९ एमएम पिस्तूल व मॅगझीन, पॉईंट ३२ इंच पिस्तूल व मॅगझीन, लॅथोडे बॉम्ब, एके-५६ रायफलची २२ जिवंत काडतूस, ९ एमएमचे आठ राऊंड, एम-१६ रायफलचे नऊ राऊंड, एक एम-१६ रायफल ग्रेनेड आणि रेडिओ सेट जप्त करण्यात आल्याचे आसाम रायफलतर्फे सांगण्यात आले . जप्त करण्यात आलेला सर्वसाठा नांबोल पोलिसांकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, आणखी एका कारवाईत दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह एक बॅग, सात राऊंड आणि म्यानमारचे चलन जप्त करण्यात आले. भारत- म्यानमार सीमेवर संशयास्पद हालचाली आसाम रायफलच्या जवानांच्या दृष्टीस पडल्या होत्या. जवानांनी सीमेत घुसखोरी करू पाहणाऱ्या अतिरेक्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र दोन्ही संशयित अतिरेकी म्यानमारच्या दिशेने पळाले. त्यानंतर परिसराचा कसून शोध घेतला असता हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

leave a reply