तुर्कीची कतारमधील सैन्यतैनाती आखातातील अस्थैर्याचे कारण

-’युएई’च्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

लंडन – तुर्कीने कतारमध्ये केलेली सैन्यतैनाती आखातातील अस्थैर्यामागील एक कारण ठरते. तुर्कीच्या या सैन्यतैनातीमुळे या क्षेत्रातील नकारात्मकता वाढल्याचा आरोप संयुक्त अरब अमिरातचे (युएई) परराष्ट्रमंत्री अन्वर गरगाश यांनी केला. गेल्या आठवड्यात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी कतारचा दौरा केला होता. या दौर्‍यात एर्दोगन यांनी कतारमधील सैन्यतैनाती वाढविण्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर युएईकडून ही प्रतिक्रिया उमटल्याचे दिसत आहे.

तुर्कीची कतारमधील सैन्यतैनाती आखातातील अस्थैर्याचे कारण -’युएई’च्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोपगेल्या आठवड्यात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी कतार तसेच कुवैत या दोन आखाती देशांचा विशेष दौरा केला होता. यापैकी कतारच्या दौर्‍यात तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी कतारचे राष्ट्रप्रमुख आमिर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेऊन तुर्कीच्या सैन्यतैनातीबाबत चर्चा केली होती. कतारमधील तुर्कीची ही सैन्यतैनाती आखातातील स्थैर्यासाठी आवश्यक असल्याची प्रतिक्रिया एर्दोगन यांनी एका कतारी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. कतारची राजधानी दोहा येथील लष्करी तळावर तुर्कीचे पाच हजार सैनिक तैनात आहेत. याव्यतिरिक्त तुर्की कतारला युद्धनौका देखील पुरविणार आहे. एर्दोगन यांच्या या कतार भेटीवर युएईने आक्षेप घेतला आहे.

“अरब देशांमधील तुर्कीची ही सैन्यतैनाती या क्षेत्रातील अस्थैर्य, संकट वाढविणारी असून यामुळे अरब देशांचे ध्रुवीकरण झाले आहे. अरब देशांमध्ये सैन्यतैनाती करताना तुर्कीने या क्षेत्रातील देशांच्या सार्वभौमत्वाचा विचार केला नाही आणि येथील जनतेच्या हितसंबंधांची पर्वाही केली नाही”, अशी टीका परराष्ट्रमंत्री गरगाश यांनी केली. त्याचबरोबर तुर्कीच्या या सैन्यतैनातीमुळे आखाती देशांमधील अस्थैर्य वाढल्याचा आरोपही युएई’च्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

leave a reply