जम्मू-काश्मीरच्या पुंछ, राजौरीमधील ऑपरेशन लांबण्याची शक्यता

जम्मू – जम्मू-काश्मीरच्या पुंछ आणि राजौीरमधील जंगलात दहशतवाद्यांविरोधात हाती घेण्यात आलेल्या ऑपरेशनचा शनिवारी २० वा दिवस होता. हे ऑपरेशन आणखी काही दिवस लांबू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. येथील घनदाट जंगलांचा फायदा घेऊन दहशतवादी सतत आपला ठिकाणा बदलत असून दहशतवादी सुरक्षादलांबरोबर थेट चकमक टाळत असल्याची माहिती अधिकार्‍यांच्या हवाल्याने येत आहे. आतापर्यंत या ऑपरेशनदरम्यान ९ जवान शहीद झाले आहेत. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी वाढण्याआधी घुसखोरी प्रयत्नही वाढले आहेत. नियंत्रण रेषेपलिकडे दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्याच्या बातम्या येत आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पुंछ, राजौरीमधील ऑपरेशन लांबण्याची शक्यताजम्मू-काश्मीरमच्या पुंछमधील मांढेरमधील भाटा धुरियातील जंगलात व शेजारी सारनकोटच्या जंगलांमध्ये ११ ऑक्टोरबरला उडालेल्या चकमकीनंतर या ऑपरेशनला सुरूवात झाली होती. पुंछ व राजौरीमध्ये पसरलेल्या या पीर पंजारच्या जंगलक्षेत्राचा भाग असलेल्या या जंगलात आतापर्यंत तीन वेळा सुरक्षादल आणि दहशतवाद्यांचा थेट आमनासामना झाला आहे. मात्र २४ ऑक्टोबरनंतर दहशतवाद्यांबरोबर थेट चकमक उडालेली नाही. या जंगलात दहशतवाद्यांच्या हालचालीची माहिती एका स्थानिक मजूराने सुरक्षादलांना दिल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर हे संयुक्त ऑपरेशन हाती घेण्यात आले. गेल्या अठरा वर्षातील जम्मू-काश्मीरमधील हे सर्वात मोठे आणि दिर्घकाळ चालणारे ऑपरेशन ठरले आहे. २००३ मध्ये अशाच प्रकारे सुरनकोटच्याच जंगलात हिलकाका येथे सर्पविनाश नावावे प्रचंड मोठे ऑपरेशन झाले होते. जानेवारी ते एप्रिल २००३ सालापयर्र्ंत सुरू राहिलेल्या ऑपरेशनदरम्यान ६२ दहशतवादी ठार झाले होते.

सध्या सुरू असलेले ऑपरेशन अशाच प्रकारे दिर्घकाळ चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आतापर्यंत या ऑपरेशनदरम्यान मोठा शस्त्रसाठा जप्त झाला आहे. तसेच दहशतवाद्यांची काही ठिकाणेही उद्ध्वस्त करण्यात आली आहे. काही स्थानिकांनी दहशतवाद्यांना सहाय्य केल्याचा संशय आहे. या पार्श्‍वभूमीवर काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या दहशतवाद्यांना अन्नधान्य इतर गोष्टी पुरविल्याचा त्यांच्यावर संशय आहे.

एका लष्करी अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी सध्या सुरक्षादलांबरोबर थेट आमनासामना टाळत आहेत. घनदाट जंगल आणि नैसर्गिक गुंफाचा लाभ दहशतवाद्यांना मिळत आहे व याद्वारे दहशतवादी सतत सुरक्षादलांपासून दूर पळ काढत असून त्यामुळे दहशतवाद्यांना एका ठिकाणी बांधून ठेवणे कठीण जात आहे.

या ऑपरेशनच्या पार्श्‍वभूमीवर भिंबार गली, जेरा वाली गली आणि जम्मू-राजौरी महामार्गावरील वाहतूक अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या पंधरादिवसांपासून येथील वाहतूक बंद आहे. जून महिन्यातच दहशतवाद्यांनी या भागात घुसखोरीचे प्रयत्न सुरू झाले होते. या घुसखोरीच्या प्रयत्नांदरम्यान झालेल्या चकमकीत ९ दहशतवादीही मारले गेले आहेत. दरम्यान, शनिवारी नौशेरा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात एका अधिकार्‍यासह दोन जवान शहीद झाले.

जम्मू-काश्मीरमध्ये रस्ते, शाळांना शहीदांची नावे
जम्मू-काश्मीरमध्ये रस्ते, शाळा व सरकारी संस्थांना शहीदांची नावे देण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर प्रशासनाने चार दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानंतर त्यावर ताबडतोब अंमलबजावणी करीत १०८ नावांची यादी तयार करण्यात आली, तर यातील ७६ नावे गेल्या दोन दिवसात विविध संस्थांसाठी निश्‍चित करून त्याची यादीही जाहीर करण्यात आली आहे. शाळांमधून या शहीदांची वीरगाथा मुलांना सांगावी असे आदेशही देण्यात आले आहेत.

त्याचवेळी सीआरपीएफच्या कायमस्वरुपी छावण्यासाठी १० जागा देण्यात आल्या आहेत. इतक्या वर्षात प्रथमच सीआरपीएफसाठी अशा जमिनी देण्यात येत आहेत. याची चार जागा या पुलवामामध्ये, तर प्रत्येकी तीन जागा शोपियान व अनंतनागमध्ये आहेत.

leave a reply