भविष्यातील युद्धांसाठी ‘डिसरप्टिव टेक्नोलॉजीज्’वर अधिक भर देण्याची आवश्यकता

- भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे

नवी दिल्ली – प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगाने होणाऱ्या उदयामुळे युद्धतंत्रात आमूलाग्र बदल होत असून, भारतीय लष्कराला ‘डिसरप्टिव टेक्नोलॉजीज्’वर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी केले. लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले असून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेबाबत सुरू असलेली राजनैतिक चर्चा अपयशी ठरल्यास भारत लष्करी पर्यायाचा अवलंब करू शकतो, असे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी चीनला बजावले होते. या पार्श्वभूमीवर ‘डिसरप्टिव टेक्नोलॉजीज्’संदर्भात लष्करप्रमुखांनी मांडलेली भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरते.

'डिसरप्टिव टेक्नोलॉजीज्'

मध्य प्रदेशच्या महूमधील ‘आर्मी वॉर कॉलेजमध्ये ‘इम्पॅक्ट ऑफ डिसरप्टिव टेक्नोलॉजीज् ऑन अवर फायटिंग फिलॉसॉफी इन फ्युचर कॉनफ्लिक्ट्स’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लष्करप्रमुख नरवणे यांनी युद्ध लढण्यावर आणि युद्धातील ‘डिसरप्टिव टेक्नोलॉजीज्’च्या परिणामांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ‘डिसरप्टिव टेक्नोलॉजीज्’ वर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) , रोबोटिक्स, ‘सायबर वॉरफेअर’, ५ जी, क्लाउड कॉम्प्युटिंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, अवकाश तंत्रज्ञान यासारख्या तंत्रज्ञानांचा ‘डिसरप्टिव टेक्नोलॉजीज्’मध्ये समावेश होतो.

‘सध्याची संरक्षणदलांची आधुनिकीकरण मोहीम विद्यमान शस्त्र प्रणाली आणि प्लॅटफॉर्म अद्ययावत करण्यावर केंद्रित आहे. मात्र आता यापुढे भारतीय सैन्याला दुहेरी उपयोग असलेल्या उपलब्ध प्रगत तंत्रज्ञानावर पुरेसा भर द्यावा लागेल’, असे लष्करप्रमुख नरवणे यांनी सांगितले. लष्कराकडून ड्रोन, लेझर, रोबोट आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यात येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भारतीय संरक्षणदलांनी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानावर किंवा इतरांच्या सहकार्याने विकसित व विकत घेता येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वापरावरही भर देण्याची गरज असल्याचे लष्कर प्रमुखांनी नमूद केले.

‘आज युद्धतंत्रामध्ये बरेच बदल झाले आहेत. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाची त्सुनामी आली आहे, ज्यामुळे भविष्यातील युद्धासाठी सैन्याने स्वत:ला बदलावे लागेल’, असे लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

leave a reply