बलोच बंडखोरांच्या धमकीनंतर भेदरलेल्या चीनच्या नागरिकांचे पाकिस्तानातून पलायन

बलोच बंडखोरकराची – बलोच बंडखोरांनी कराची विद्यापीठात घडवलेला आत्मघाती हल्ला व त्यानंतर दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानातील चिनी नागरिकांमध्ये पळापळ सुरू झाली आहे. चिनी नागरिक मोठ्या प्रमाणात पाकिस्तान सोडून जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कराचीतील आत्मघाती हल्ल्यात तीन चिनी नागरिकांचा बळी गेला होता. यानंतर चीनने पाकिस्तान सरकार आणि लष्कराला चिनी नागरिकांच्या सुरक्षेत दुपटीने वाढ करण्याची सूचना केली होती. पण बलोच बंडखोरांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे चिनी नागरिक पाकिस्तानात थांबण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या चीनसाठी हा मोठा धक्का मानला जातो.

बलोच बंडखोर

पाकिस्तानच्या कराची शहरात मंगळवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात चार जणांचा बळी गेला. यानंतर चीन आपल्या नागरिकांचे रक्त वाया जाऊ देणार नसल्याची घोषणा चीनने केली होती. चिनी नागरिकांवरील हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या बलोच बंडखोर संघटनेच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवण्याचा इशाराही चीनने आपल्या सरकारी मुखपत्रातून दिला होता. बलोच बंडखोरांवरील कारवाईसाठी चीन आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना रवाना करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चीन पाकिस्तानच्या गुलामासारखा वापर करीत असल्याची चिंता पाकिस्तानातील काही विश्लेषकांनी व्यक्त केली होती. बलोच बंडखोरांवरील कारवाईसाठी चीनने हवाई हल्ले चढवले, तर पुढच्या काळामध्ये कुठलाही देश दहशतवादविरोधी कारवाईचे कारण देऊन पाकिस्तानला लक्ष्य करेल, अशी भीती या विश्लेषकांनी व्यक्त केली होती.

हे सारे घडत असताना पाकिस्तानातील वेगळ्या प्रकल्पांमध्ये काम करणारे चिनी नागरिक पाकिस्तान सोडून पलायन करीत असल्याचे व्हिडिओज समोर येत आहेत. कराची विमानतळावरच चिनी नागरिक पीपीपी किट्समध्ये उभे असल्याचे व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. फक्त कराची नाही तर लाहोर शहरातील चिनी नागरिकांमध्येही भीती निर्माण झाल्याचे दावे केले जातात.

चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर या प्रकल्पामध्ये चीनने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. पण चीन या प्रकल्पाद्वारे आमच्या खनिज संपत्तीची मोठी लूट करीत असल्याचा आरोप बलोच बंडखोर करीत आहेत. आतापर्यंत चिनी कर्मचाऱ्यांवरील हल्ले बलुचिस्तान प्रांतापर्यंतच मर्यादित होते. पण कराचीतील आत्मघाती हल्ल्याने चीनच्या चिंता वाढविल्या आहेत.

leave a reply