शत्रूचा हल्ला होण्यापूर्वीच उत्तर कोरिया अणुहल्ला चढविल

- उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी धमकावले

प्योनग्यँग/सेऊल – शत्रूदेशांकडून देण्यात येणाऱ्या अणुहल्ल्याच्या धमक्या व इतर धोकादायक हालचाली रोखण्यासाठी उत्तर कोरिया शत्रूचा हल्ला होण्यापूर्वीच अणुहल्ला चढविल, अशी धमकी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी दिली. उत्तर कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या एका बैठकीत हुकूमशहा किम जाँग-उन यांनी ही धमकी दिली आहे. यावेळी त्यांनी उत्तर कोरियाचे ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ सुसज्ज करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने राबविण्यात येईल, असेही बजावले. गेल्याच महिन्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांची बहिण असलेल्या किम यो यांनी, उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांनी दक्षिण कोरियाच्या हल्ल्याला उत्तर देईल, असे धमकावले होते.

काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाच्या संरक्षणदलाकडून भव्य लष्करी संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संचलनात उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तसेच अण्वस्त्रे सादर केली होती. संचलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने आपली क्षेपणास्त्रे सर्व शत्रूदेशांचा वेध घेण्यास सज्ज असल्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी दिलेल्या धमकीचे वृत्त समोर आले आहे.

गेल्या चार महिन्यात उत्तर कोरियाने 12 क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. त्यात अमेरिकेच्या पूर्वेकडील शहरांचा वेध घेणाऱ्या ‘हॅसाँग-17′ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासह लघु ते मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश होता. त्याचबरोबर उत्तर कोरियाने मोबाईल लाँचर आणि पाणबुडीतूनही क्षेपणास्त्रांची चाचणी करून आपली सज्जता दाखवून दिली, असा दावा माध्यमे तसेच विश्लेषक करीत आहेत. या चाचण्या घेत असतानाच उत्तर कोरियाने अमेरिकेच्या कारवाया ‘डेंजर लाईन’पर्यंत पोहोचल्याचा ठपका ठेवून अमेरिकेला नव्या अणुचाचण्यांवरून धमकावले होते.

उत्तर कोरियाच्या चाचण्यांमधून त्याच्या वाढत्या आण्विक क्षमतेचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी दिलेली धमकी लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

leave a reply