चीनला रोखण्यासाठी ‘क्वाड’मध्ये फ्रान्सला सहभागी करण्याच्या हालचाली

नवी दिल्ली – भारत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र सचिवांमध्ये बुधवारी पहिली त्रिपक्षीय बैठक पार पडली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर तसेच येथील आव्हानांवर यावेळी चर्चा झाली. या क्षेत्रातील चीनच्या वाढत असलेल्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर भारत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियातील या बैठकीचे महत्त्व वाढले आहे. दरम्यान, भारत, ऑस्ट्रेलियासह अमेरिका आणि जपान यांचा समावेश असलेल्या ‘क्वाड’मध्ये सहभागी होण्यासाठी आपण उत्सूक असल्याचे संकेत फ्रान्सने काही दिवसांपूर्वी दिले होते.

‘क्वाड’

भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रींगला, फ्रान्सचे परराष्ट्र सचिव फ्रँकोई देलाट्रे आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र सचिव फ्रान्सेस ऍडम्सन यांच्यात बुधवारी ही चर्चा पार पडली. तीनही देशांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमधील ही पहिली बैठक असून यापुढे दरवर्षी अशा स्वरुपाची बैठक आयोजित करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. या बैठकीत इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आर्थिक तसेच सामरिक आव्हानांचा सामना करण्याबाबत आणि तीनही देशांमधील सहकार्यावर चर्चा पार पडल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केली. कोरोनाव्हायरसविषयी सहकार्य तसेच त्यानंतरचे जग, यावरही तीनही अधिकार्‍यांमध्ये चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

‘मरिन ग्लोबल कॉमन्स’ आणि क्षेत्रीय स्तरावर सहकार्य वाढविण्याच्या मुद्यावरही भर देण्यात आला. शांती, सुरक्षा आणि समृद्धी व नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिक क्षेत्र घडविण्याचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. या चर्चेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने केलेली आगळीक आणि साऊथ चायना सी’मधील चीनची आक्रमकता यांच्या पार्श्वभूमीवर या त्रिपक्षीय बैठकीला फार मोठे सामरिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चीनला रोखण्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये क्वाडची स्थापना झाली आहे. फ्रान्सनेही भारताबरोबर द्विपक्षीय सामरिक सहकार्य करार केले असून क्वाडमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून भारत, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया यांच्यात ही त्रिपक्षीय चर्चा आयोजित करण्यात आली आहे.

लवकरच भारत आणि ऑस्ट्रेलियाची इंडोनेशियासह देखील त्रिपक्षीय बैठक आयोजित केली जाईल. ‘क्वाड’मध्ये मित्र व सहकारी देशांना एकत्र आणून ‘क्वाड प्लस’ उभारण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते. आग्नेय आशियाई देशांना क्वाडमध्ये सहभागी करण्यासाठी ऑस्ट्रेलिया व जपानचे प्रयत्न सुरू आहेत. तर काही दिवसांपूर्वी ब्रिटन आणि जर्मनीनेही इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करुन ‘क्वाड’मध्ये सहभागी होण्याची व मोठी मजबूत संघटना उभारण्याची घोषणा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

leave a reply