सायबरहल्ला प्रकरणात अमेरिकेच्या ‘एफबीआय’ची चिनी कंपनीवर धाड

सायबरहल्लावॉशिंग्टन – अमेरिका व युरोपमध्ये झालेल्या सायबरहल्ल्यांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून अमेरिकेची मध्यवर्ती तपासयंत्रणा ‘एफबीआय’ने चिनी कंपनीच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत. क्रेडिट कार्ड मशिन बनविणार्‍या ‘पॅक्स’ कंपनीच्या फ्लोरिडा प्रांतातील कार्यालयासह इतर जागांवर धाडी टाकण्यात आल्याची माहिती अमेरिकी यंत्रणांनी दिली. २४ तासांपूर्वीच अमेरिकेने ‘चायना टेलिकॉम’ या कंपनीवर बंदीची घोषणा केली होती.

चीनची ‘पॅक्स टेक्नॉलॉजी’ ही कंपनी ‘क्रेडिट कार्ड रिडर’ बनविणारी जगातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखण्यात येते. जगातील १२० देशांमध्ये या कंपनीची सहा कोटींहून अधिक मशिन्स कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी या कंपनीकडून वापरण्यात येणार्‍या यंत्रणेचा वापर अमेरिका तसेच युरोपमध्ये झालेल्या सायबरहल्ल्यांमध्ये करण्यात आल्याचे दावे समोर आले होते. अमेरिकेतील एका मोठ्या ‘पेमेंट प्रोसेसिंग’ कंपनीनेही पॅक्सबाबत तक्रारी केल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर ‘एफबीआय’, ‘डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटी’ व इतर यंत्रणांनी कारवाई सुरू केली आहे. सायबरहल्ल्याच्या प्रकरणातील सहभागावरून ‘एफबीआय’सह ‘एमआय५’ ही ब्रिटीश गुप्तचर यंत्रणाही चिनी कंपनीची चौकशी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारवाई झाल्यानंतर चिनी कंपनीने उलटे दावे करण्यास सुरुवात केली असून धाडीची मोहीम राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.

‘पॅक्स’वर टाकण्यात आलेल्या धाडी गेल्या २४ तासांमधील चिनी कंपनीविरोधातील दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. मंगळवारी अमेरिकेच्या ‘फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन’ने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून ‘चायना टेलिकॉम’ कंपनीवर बंदी टाकत असल्याचे जाहीर केले होते.

leave a reply