भारताबरोबरील संघर्ष चीनच्या हिताचा नाही

- वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया

नवी दिल्ली – ‘लडाखच्या एलएसीवर चीनने मोठ्या प्रमाणात रडार्स, जमिनीवरून हवेत व जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. चीनची ही तैनाती जबरदस्त आहे खरी. पण याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही आवश्यक ती सारी सिद्धता करून ठेवलेली आहे. मात्र चीनच्या जागतिक पातळीवरील महत्त्वाकांक्षा लक्षात घेता, भारताबरोबर संघर्ष छेडणे चीनच्या हिताचे ठरणार नाही’, असे भारताचे वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी म्हटले आहे.

भारताबरोबरील संघर्ष

माध्यमांशी संवाद साधताना वायुसेनाप्रमुखांनी चीनच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षा आणि लडाखच्या एलएसीवरील चीनच्या कारवाया यांच्यामधल्या विसंगतीवर नेमके ठेवले. आंतराष्ट्रीय पातळीवर आपण महाशक्ती असल्याचे चीन सातत्याने प्रदर्शित करीत आला आहे. मात्र एलएसीवर वाद छेडून चीनच्या हाती काही लागणार नाही, उलट याने चीनची हानी होण्याची शक्यता आहे, याकडे वायुसेनाप्रमुखांनी निर्देश केला. सध्या लडाखच्या एलएसीवर चीनने अत्याधुनिक रडारयंत्रणा, जमिनीवरून हवेत व जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केलेली आहेत. ही तैनाती जबरदस्त असली तरी त्याला सडेतोड उत्तर देण्याची सिद्धता आम्ही ठेवलेली असल्याचे सांगून भारत चीनच्या दडपणाखाली येणार नाही, असे वायुसेनाप्रमुखांनी बजावले.

सध्याच्या काळात भू-राजकीय पातळीवरील अनिश्‍चितता व अस्थैर्य यांचा चीन लाभ घेत आहे. अशा काळात चीनकडून आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन सुरू असताना, प्रमुख देशांची अक्षमता यामुळे ऐरणीवर आलेली आहे, अशी टीका वायुसेनाप्रमुखांनी केली. थेट उल्लेख केला नसला तरी अमेरिकेतील सत्ताबदलाचा तसेच इतर ब्रेक्झिटवरून सुरू असलेल्या अनिश्‍चिततेचा चीनने लाभ उचलल्याचे संकेत वायुसेनाप्रमुखांकडून दिले जात आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीचा चीन प्रत्यक्ष व पाकिस्तानचा वापर करून अप्रत्यक्ष लाभ उचलणार असल्याचा इशारा एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी दिला आहे.

तसेच पाकिस्तानवर सडकून टीका करताना भारताच्या वायुसेनाप्रमुखांनी पाकिस्तान चीनचे प्यादे बनत चालल्याचा शेरा मारला. सीपीईसी प्रकल्पामुळे पाकिस्तान चीनच्या कर्जाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकत असल्याचा ठपका ठेवला आहे. दरम्यान, ‘आत्ताच्या काळाती तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत माफक खर्चात मोठा विध्वंस घडवून आणला जाऊ शकतो. त्याचा वापर एखाद्या देशाकडून किंवा देशाच्या सीमा न जुमानणार्‍यांकडून केला जाईल’, अशी चिंता वायुसेनाप्रमुख भदौरिया यांनी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय नेते तसेच संरक्षणदलांचे वरिष्ठ अधिकारी चीनला आक्रमक भाषेत इशारे देऊ लागले आहेत. वायुसेनाप्रमुखांनी दिलेला इशारा हा देखील याचच भाग असल्याचे दिसते. चीनने भारताच्या विरोधात अधिकृत पातळीवर आक्रमक भाषा वापरलेली नसली तरी चीन भारताला अद्दल घडविण्याची तयारी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. लडाखच्या एलएसीवरील संघर्षात चीनला मानहानी स्वीकारावी लागली होती.

भारतीय लष्कर एलएसीवरील भागात चीनवर वर्चस्व गाजवित असल्याची बाब पाश्‍चिमात्य माध्यमांनी मान्य केली होती. यामुळे अस्वस्थ झालेला चीन लडाखच्या एलएसीवरील संघर्षात आपण भारतावर कुरघोडी केल्याचे सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी चीनने प्रचारमोहीम देखील राबविली होती. मात्र याबाबत चीनने केलेले दावे कुणीही स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे चीन नव्या डावपेचांचा वापर करू लागला असून काही दिवसांपूर्वीच चीनच्या राजवटीने एलएसीच्या सुरक्षेची जबाबदारी नव्या लष्करी?अधिकार्‍यावर सोपविली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील सीमावादावरील चर्चा लांबणीवर पडल्याचे बोलले जाते.

leave a reply