चीन व पाकिस्तानचा धोका लक्षात घेऊन संरक्षणदल 15 दिवसांच्या युद्धाची तयारी ठेवणार

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवर चीनबरोबरील तणाव वाढलेला असताना, काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तान लांब पल्ल्याच्या तोफांचा भडीमार करीत आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराने दोन आघाड्यांवरील युद्धाची सज्जता केली असून 15 दिवसांच्या संपूर्ण युद्धाचा दारूगोळा व इतर आवश्‍यक गोष्टींचा साठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार तिन्ही संरक्षणदलांकडून सुमारे 50 हजार कोटी रुपयांचे शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य खरेदी केले जाऊ शकते, असा दावा सूत्रांकडून केला जात आहे.

संरक्षणदल

आत्तापर्यंत संरक्षणदलांकडून सुमारे 10 दिवसांच्या युद्धाची पूर्ण तयारी ठेवली जात होती. पण देशाच्या दोन्ही आघाड्यांवर युद्धाची शक्यता बळावली आहे. ही बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन संरक्षणदलांना 15 दिवसांचा दारूगोळा व इतर आवश्‍यक गोष्टींचा साठा तयार ठेवणे अत्यावश्‍यक बनले आहे. यासाठी संरक्षणदलांकडून सुमारे 50 हजार कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे, दारूगोळा, संरक्षणसाहित्य व इतर यंत्रणांची जलदगतीने खरेदी जाऊ शकते. यासाठी देशांतर्गत तसेच परदेशातूनही खरेदी करण्याचे अधिकार संरक्षणदलांना देण्यात आलेले आहेत.

आधीच्या काळात संरक्षणदलांकडून सुमारे 40 दिवसांच्या युद्धाची संपूर्ण तयारी ठेवली जात होती. पण युद्धाचे बदललेले स्वरुप लक्षात घेऊन ही तयारी 10 दिवसांपर्यंत आणण्यात आली होती. मात्र 2016 साली उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी युद्धाची तयारी करण्यासाठी तिन्ही संरक्षणदलांना आवश्‍यक असलेला निधी वाढविण्याचा निर्णय घेतला होता. आधीच्या काळात 100 कोटी रुपयांवर असलेला हा निधी पर्रीकर यांनी 500 कोटी रुपयांवर नेला. तसेच संरक्षणदलांना आवश्‍यकता भासल्यास 300 कोटी रुपयांपर्यंतच्या रक्कमेची कुठल्याही क्षणी खरेदी करण्याचे विशेष अधिकारही पर्रीकर यांच्या कार्यकाळात संरक्षणदलांना बहाल करण्यात आले होते.

यानंतरच्या काळात आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्‍यक असलेली क्षेपणास्त्रे, दारूगोळा, रणगाडे व तोफा यांची पर्याप्त प्रमाणात खरेदी संरक्षणदलांनी केली होती. पण आत्ताच्या काळात चीन व पाकिस्तानकडून भारताच्या सुरक्षेला मिळत असलेल्या आव्हानांचा विचार करता युद्धसज्जता वाढविण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. त्यानुसार 15 दिवसांच्या संपूर्ण युद्धाची सिद्धता ठेवण्यासाठी संरक्षणदलांना आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून देण्याची तयारी झालेली आहे.

यामुळे देशाची संरक्षणसिद्धता अधिकच वाढणार असून भारताच्या या तयारीचा संदेश चीन व पाकिस्तानला मिळणार आहे. भारतावरील लष्करी दडपण वाढविण्यासाठी चीन गेल्या काही महिन्यांपासून धडपडत आहे. त्यासाठी चीनने प्रचारयुद्ध छेडण्यापासून ते लडाखच्या एलएसीवर अधिक तैनाती करण्यापर्यंतच्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत. मात्र गलावनच्या खोऱ्यात चीनच्या लष्कराने चढविलेल्या भ्याड हल्ल्यानंतर, भारताने चीनला सर्वच पातळ्यांवर प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवलेली आहे. भारताकडून अशा स्वरुपाची प्रतिक्रिया उमटेल, याचा चीनने विचार केला नव्हता. त्यामुळे सध्या चीनची तारंबळ उडाल्याचा दावा पाश्‍चिमात्य सामरिक विश्‍लेषकांकडून केला जात आहे. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या लष्कराकडून लांब पल्ल्याच्या तोफांचा मारा करण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या माऱ्याचा रोख नागरी वस्त्यांकडे असल्याचा आरोप भारताचे उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल सत्तींदर कुमार सैनी यांनी केला. भारतीय लष्कर पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत आहे. त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची भारतीय लष्कराने जय्यत तयारी ठेवलेली आहे, असे लेफ्टनंट जनरल सैनी यांनी म्हटले आहे. त्याचवेळी लडाखच्या एलएसीवरील तणाव इतक्यात कमी होण्याची अजिबात शक्यता नाही, त्यासाठी बराच कालावधी लागू शकतो, असे सूचक विधान लेफ्टनंट जनरल सैनी यांनी केले आहे.

leave a reply