वेस्ट बँकमध्ये इस्रायलकडून नव्या वस्त्यांची उभारणी

वेस्ट बँकजेरूसलेम – ‘आम्ही इथेच राहणार आहोत आणि इस्रायलची उभारणी यापुढेही सुरूच राहिल’, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली. वेस्ट बँकच्या ज्यूडिया आणि समारिया या शहरांमध्ये इस्रायली निर्वासितांसाठी ८०० वसाहतींच्या बांधकामांना मंजुरी दिल्याची माहिती देताना, पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी ही घोषणा केली आहे. ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केलेली ही घोषणा लक्षवेधी असल्याचे इस्रायली व तुर्कीची माध्यमे सांगत आहेत.

वेस्ट बँकच्या उत्तरेकडील इतामर, बैत एल, शावेई शोमरॉन, ओरानित आणि गिवात झिव्ह, तसेच ताल मेनाशे व नोफेई नेहेमिया या भागांमध्ये ८०० वस्त्यांचे बांधकाम सुरू होणार आहे. यापैकी २०० वस्त्या नोफेई नेहेमिया तर १०० वस्त्यांचे बांधकाम ताल मेनाशेमध्ये केले जाईल. यापैकी ताल मेनाशेमधील वस्त्यांच्या बांधकामाला मंजुरी देऊन इस्रायलचे पंतप्रधान वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी प्रशासनाला संदेश देत असल्याचा दावा केला जातो.

गेल्याच आठवड्यात ताल मेनाशेतील हल्ल्यात ‘इस्थर होरगेन’ या ज्यू महिलेचा बळी गेला होता. दहशतवाद्यांनी तिची हत्या घडविल्याचा आरोप इस्थरच्या पतीने केला होता. तसेच नेत्यान्याहू सरकारने ताल मेनाशे भागातील वस्त्यांचे बांधकाम वाढवावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे इस्रायल सरकारने ताल मेनाशे भागात १०० वस्त्या उभारण्याचे जाहीर करून येथील कट्टरपंथियांना इशारा दिल्याचे बोलले जाते. इस्रायली पंतप्रधानांनी वेस्ट बँकमधील वस्त्यांच्या बांधकामाची घोषणा केली असली तरी पुढच्या आठवड्यात संरक्षण मंत्रालयाकडून यावर शिक्कामोर्तब होणार आहे. वेस्ट बँकपुढच्या आठवड्यात इस्रायलच्या बांधकाम विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीत याला मंजुरी मिळणार असल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. तर ज्यो बायडेन यांच्या शपथग्रहणाआधी इस्रायल वेस्ट बँकमधील या नव्या बांधकामांना मंजुरी देत असल्याचे इस्रायली व तुर्कीची माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन हे वेस्ट बँकमधील इस्रायलच्या वस्त्यांच्या बांधकामाचे कडवे विरोधक आहेत. २०१० साली ओबामा प्रशासनात उपराष्ट्राध्यक्षपदावर असताना बायडेन यांनी उघडपणे इस्रायलच्या वस्त्यांच्या बांधकामावर टीका केली होती. तर बायडेन इस्रायलच्या भेटीवर असताना इस्रायलने जेरूसलेममध्ये १६०० वस्त्यांच्या निर्मितीची घोषणा केली होती. वेस्ट बँकमध्ये वस्त्यांचे बांधकाम करून इस्रायल आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करीत असल्याची टीका अमेरिका तसेच युरोपिय देशांनी केली होती. पण इस्रायलने हे आरोप फेटाळले होते.

दरम्यान, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या वस्त्यांच्या बांधकामाला मंजुरी दिली होती. तसेच यामुळे कुठल्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन होत नसल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटले होते.

leave a reply