चीनच्या आक्रमकतेविरोधात अमेरिका ‘इंटिग्रेटेड मेरिटाईम फोर्स’ उभारणार

हाँगकाँग – ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात चीन वाढवित असलेल्या प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिकेने नौदल, मरिन कॉर्प्स आणि तटरक्षक दलांना एकसंघ करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेच्या या हालचालींमुळे या सागरी क्षेत्रातील तणावात भर पडेल, असा दावा हाँगकाँगस्थित दैनिकाने केला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या नौदलाने जाहीर केलेल्या ‘अ‍ॅडव्हांटेज अ‍ॅट सी’ अहवालाचा आधार घेऊन हा दावा करण्यात आला आहे.

‘इंटिग्रेटेड मेरिटाईम फोर्स’

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या नौदलाने सागरी सुरक्षेसंदर्भात ‘अ‍ॅडव्हांटेज अ‍ॅट सी’ हा अहवाल तयार केला होता. अमेरिकी नौदल, मरिन्स कॉर्प्स आणि तटरक्षक दलाच्या प्रमुखांनी एकत्र येऊन तयार केलेल्या या अहवालात सागरी क्षेत्राशी संबंधित तिन्ही दले अमेरिकेचे वर्चस्व कायम राखण्यात कशी भूमिका पार पाडतील, याची माहिती देण्यात आली होती. अमेरिका जागतिक सागरी शक्ती असल्याची आठवण या अहवालात करुन देण्यात आली होती. तसेच हे सागरी वर्चस्व टिकविण्यासाठी वेगाने पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले होते. हे आवाहन करीत असताना अमेरिकेच्या सागरी वर्चस्वाला चीन आणि रशियाकडून धोका असल्याचे यात अधोरेखित केले होते.

अमेरिकेच्या या अहवालाचा संदर्भ देत हाँगकाँगस्थित दैनिकाने अमेरिका आपल्या सागरी सैन्यदलाचे एकत्रिकरण करीत असल्याचे म्हटले आहे. ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या वाढत्या वर्चस्वाविरोधात अमेरिका ही हालचाल करीत असल्याचा दावा यात करण्यात आला. ‘साऊथ चायना सी’मधील वादग्रस्त सागरी क्षेत्रावर दावे भक्कम करण्यासाठी चीनने आपल्या नौदल सामर्थ्याचा वापर केल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. ‘अ‍ॅडव्हांटेज अ‍ॅट सी’ या नव्या रणनीतीचा वापर करून अमेरिका चीनच्या नौदल आणि तटरक्षकदलाचा प्रतिकार करण्याचे मार्ग तयार करील, असे या दैनिकाने म्हटले आहे.

‘साऊथ चायना सी’च्या ९० टक्के क्षेत्रावर आपला अधिकार सांगणारा चीन येथील आपल्या बेटांच्या सुरक्षेसाठी तटरक्षक दलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. चीनच्या या तैनातीला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने देखील आपल्या तटरक्षक दलाला ‘साऊथ चायना सी’मध्ये उतरविण्याची तयारी केल्याचे सदर अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेच्या या नव्या ‘अ‍ॅडव्हांटेज अ‍ॅट सी’ या नव्या रणनीतीमुळे ‘साऊथ चायना सी’मधील अमेरिकेच्या सागरी हालचाली वाढतील. तर या सागरी क्षेत्रावर हक्क सांगणारा चीन देखील अमेरिकेला आव्हान देईल. असे झाल्यास ‘साऊथ चायना सी’मधील अमेरिका आणि चीनमधील स्पर्धा अधिक तीव्र होईल व या क्षेत्रातील तणाव वाढेल, असा इशारा या दैनिकाने दिला आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षात चीनच्या नौदलाने आपल्या सामर्थ्यात वेगाने वाढ केली आहे. चीनकडे सुमारे ३५०हून अधिक युद्धनौका असून चीनने येत्या दशकभरात ही संख्या ४००च्या वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपल्या नौदलाची क्षमता वाढवित असताना चीनने ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रातील आपली आक्रमकताही वाढविली आहे. फिलिपाईन्स, व्हिएतनाम या देशांच्या सागरी क्षेत्रात अरेरावी करणार्‍या चीनने इंडोनेशियाच्या सागरी क्षेत्रात ड्रोन पाणबुड्या रवाना केल्याचेही काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. या पार्श्‍वभूमीवर, चीनच्या या आक्रमकतेला रोखण्यासाठी अमेरिकेने आपल्या सागरी सैन्यदलाच्या एकत्रिकरणाची तयारी केली आहे.

leave a reply