कोरोनाच्या साथीची सुरुवात ‘वुहान लॅब’मधील कर्मचाऱ्याकडूनच झाली

- ‘डब्ल्यूएचओ’च्या संशोधकाकडून ‘वुहान लॅब थिअरी’ला दुजोरा

‘वुहान लॅब’कोपनहेगन/बीजिंग – कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण (पेशंट झिरो) चीनच्या वुहान लॅबमधील कर्मचारीच असावा, त्यामुळे ही साथ वुहान लॅबमधूनच सुरू झाली असण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) प्रमुख संशोधक पीटर बेन एम्बारेक यांनी केला. एम्बारेक हे कोरोनाच्या चौकशीसाठी चीनला पाठविण्यात आलेल्या पथकाचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. डेन्मार्कमधील सरकारी टीव्हीवर प्रसिद्ध झालेल्या एका कार्यक्रमात एम्बारेक यांनी, ‘वुहान लॅब थिअरी’ला दुजोरा देतानाच चिनी यंत्रणा सातत्याने दबाव टाकत होत्या, असा दावाही केला आहे.

2019 साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिक संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही प्रसिद्ध केले. कोरोना साथीबाबत बोलणाऱ्या चिनी संशोधकांची बोलती बंद करण्यात आली. अनेक पत्रकारांनाही गायब करण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ‘वुहान लॅब’चा संबंध नाकारण्यात आला होता. त्यावेळी ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनीही त्याचे समर्थन केले होते.

मात्र चीनकडून सुरू असणाऱ्या या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व युरोपिय देशांसह जगातील प्रमुख देशांनी कोरोनाव्हायरसचा उगम चीनमधूनच झाल्याचा ठपका ठेवला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमधूनच झाल्याचा उघड आरोप केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच संशोधकांनी वुहान प्रयोगशाळेकडेच बोट दाखविले होते.

चीनमधून बाहेर पडलेल्या एका संशोधिकेनेही आपल्याकडे यासंदर्भात पुरावे असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकी यंत्रणांना ‘वुहान लॅब लीक’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘वुहान लॅब लीक थिअरी’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने चीनला दोनदा तपासाच्या नव्या टप्प्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. मात्र चीनने दोन्ही वेळेस ही मागणी नाकारली आहे. या पार्श्‍वभूमीवर डॅनिश संशोधकांनी दिलेली माहिती, चीनची कोंडी करणारी ठरली आहे.

‘टीव्ही 2’ या चॅनलवर प्रसिद्ध झालेल्या एका माहितीपटात, संशोधक पीटर बेन एम्बारेक यांनी वुहान लॅबमधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाचे नमुने घेताना त्याची बाधा झाली व त्यातूनच तो पुढे पसरला, असा दावा केला. चिनी यंत्रणांनी तपासात योग्य सहकार्य केले नाही व योग्य कागदपत्रे तसेच माहितीही पुरविली नाही, असेही एम्बारेक यांनी म्हंटले आहे. चिनी अधिकाऱ्यांनी अहवालात ‘वुहान लॅब’चा उल्लेख न करण्यासाठी सातत्याने दबाव आणला होता, असा आरोपही त्यांनी केला. ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुख संशोधकांनीच ‘वुहान लॅब थिअरी’ला दुजोरा देणे चीनला अधिकच अडचणीत आणणारी गोष्ट ठरली आहे.

काही दिवसांपूर्वी एका अमेरिकी वेबसाईटने, चीनच्या आघाडीच्या संशोधनसंस्थेतील एका संशोधकाला कोरोनाची बाधा झाली होती, असे वृत्त दिले होते. चीनच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हायरल डिसिज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेंशन’च्या (एनआयव्हीडीसी) वरिष्ठ संशोधकांना 2020 सालच्या सुरुवातीलाच कोरोना झाला होता. चीनमधील काही संशोधकांच्या ईमेल्समधून ही माहिती उघड झाल्याचे अमेरिकेच्या वेबसाईटने म्हंटले होते.

leave a reply