महाराष्ट्रात कोरोनाच्या साथीची भीषणता वाढली

- चोवीस तासात ३६ हजार रुग्ण, १११ जणांचा बळी

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या साथीची भीषणता अधिकच वाढली आहे. प्रचंड वेगाने राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढत असून गुरुवारी सुमारे ३६ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. १११ जण या साथीने दगावले आहेत. बुधवारी महाराष्ट्रात सुमारे ३२ हजार नवे रुग्ण आढळले होते. मंगळवारी २८ हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ‘एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाची साथ अधिकच तीव्र होईल. राज्यातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या तीन लाखांच्या पुढे जाईल. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधाही अपुर्‍या पडतील. तसेच दरदिवशी या साथीमुळे होणार्‍या मृत्युंची संख्याही वाढेल’, अशी भीती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे.

महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड व गुजरात या सहा राज्यांमध्ये वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येबाबत केंद्र सरकारकडून वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे. देशात या साथीमुळे सर्वाधिक बिकट स्थिती महाराष्ट्रात आहे. देशात सध्या या साथीच्या ऍक्टिव्ह केसेसची संख्या चार लाखांजवळ पोहोचली आहे. यातील महाराष्ट्रातच २ लाख ६२ हजार रुग्ण उपचार घेत आहेत.

गुरुवारी महाराष्ट्रात ३५ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद झाली, १११ जणांचा बळी गेला. मुंबईसह असलेल्या ठाणे मंडळात मिळून २५ जणांचा बळी गेला आहे. तर एकूण १० हजार ६२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ५५०५ नवे रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रात नोंदविले गेले आहेत, तर मुंबईमध्ये एकूण १३ कोरोना रुग्ण दगावले आहेत. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात १०२७ नवे रुग्ण आढळले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ९८० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

पुणे मंडळात ७३९१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तसेच २१ जणांचा या साथीत मृत्यू झाला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात ३३४० आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १७४७ नवे रुग्ण आढळले आहेत. नाशिक मंडळामध्ये ६४९३ नवे रुग्ण सापडले आहेत, तसेच १६ जणांचा बळी गेला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात २३०० रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर मंडळात ४५५६, औरंगाबाद मंडळात २६८३, अकोला मंडळात २००५, लातूर मंडळात २४५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्रात २०,४४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण ८७.७८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या महिन्यात १२ फेब्रुवारीला राज्यातील रुग्ण बरे होण्याचा हा दर ९५.९१ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. यावरून महाराष्ट्रात किती वेगाने रुग्ण वाढत आहेत व रुग्ण बरे होण्याचा दर घटत आहे, हे लक्षात येते. सध्या देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९५.२८ इतका आहे.

बुधवारपासून गुरुवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात ५३ हजार नव्या रुग्ण आढळले. यातील ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. या वर्षात देशात चोवीस तासात नोंद झालेले कोरोनाच्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे

leave a reply