सुएझ कालव्याची कोंडी फोडण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागेल

- प्रतिदिन साडेनऊ अब्ज डॉलर्सची मालवाहतूक ठप्प

कैरो/लंडन – ‘‘‘एमव्ही एव्हर गिव्हन’ मालवाहू जहाजामुळे सुएझ कालव्यात निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी दिवस नाही तर आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. हे जहाज इथून हलविणे म्हणजे किनार्‍यावर रूतलेल्या विशालकाय व्हेल माशाला हलविण्यासारखा प्रकार ठरतो’’, असा इशारा या कामात सहभागी झालेल्या कंपनीने दिला. कंटेनर जहाजाने केलेल्या या कोंडीमुळे दिवसाकाठी साडेनऊ अब्ज डॉलर्सहून अधिक मालवाहतूक ठप्प होत आहे. भूमध्य समुद्राच्या जवळ दीडशेहून अधिक कंटेनर जहाजांच्या रांगा लागल्या आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी जितका अधिक वेळ लागेल, आर्थिक नुकसान तेवढे वाढत जाईल, असा दावा केला जातो.

मंगळवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास सुएझ कालव्यातून भूमध्य समुद्राच्या दिशेने प्रवास करणार्‍या ‘एव्हर गिव्हन’ कंटेनर जहाजाला धूराच्या वादळाचा सामना करावा लागला. या वादळामुळे कॅप्टनने नियंत्रण गमावले आणि सदर जहाज दोन्ही किनार्‍यांमध्ये रुतल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. दोन लाख २० हजार टन वजनाच्या या जहाजाची लांबी ४०० मीटर इतकी आहे. चीनमधून निघालेले सदर जहाज जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज असून एकावेळी २० हजार कंटेनर्स वाहून नेण्याची यामध्ये क्षमता आहे. अशा परिस्थितीत, वादळाने जहाजाची दिशा बदलल्यामुळे यातील २५ कर्मचारी आणि कंटेनर्सच्या सुरक्षेबाबत विचारणा झाली होती. पण या दुर्घटनेत कुठलीही हानी झाली नसल्याचा दावा केला जातो.

या जहाजाला काढण्यासाठी ‘बोस्कालीस’ या युरोपियन कंपनीला कंत्राट दिले आहे. एव्हर गिव्हन म्हणजे विशालकाय व्हेल माशासारखे असल्याचे या कंपनीच्या प्रमुखांनी म्हटले आहे. भारी वजनाच्या व्हेल माशाला किनार्‍यावरुन हलविणे जसे अवघड असते, तसेच हजारो कंटेनर्स, इंधन आणि इतर साहित्यांनी भरलेल्या या जहाजाला बाहेर काढणे अवघड असल्याचे संबंधित प्रमुखांनी सांगितले. यासाठी संपूर्ण जहाज रिकामे करून टग बोटींच्या आधाराने या जहाजाला हलवावे लागेल. त्यामुळे यासाठी काही दिवस नाही तर आठवड्यांची मुदत खर्च होऊ शकते, असे या कंपनीने स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसात प्रयत्न करूनही या जहाजाच्या दिशेत बदल झालेला नसल्याचा दावा केला जातो.

सदर कंपनीने प्रसिद्ध केलेल्या या माहितीनंतर कित्येकांच्या चिंता वाढल्या आहेत. या कालव्यातून दर दिवशी किमान ५० कंटेनर जहाजांची रेलचेल होत असते. सलग तीन दिवस या मार्गाची कोंडी झाल्यामुळे किमान दीडशे जहाजे अडकून पडली आहेत. इजिप्तच्या उत्तरेकडील पोर्ट सईदच्या भागात ही जहाजे प्रतिक्षेत असल्याची माहिती समोर येत आहे.

या कालव्यातून दर दिवशी ९.६ अब्ज डॉलर्सची मालवाहतूक केली जाते, अशी माहिती ब्रिटनस्थित ‘लॉईड्स लिस्ट’ या कंपनीने दिली आहे. यामध्ये युरोपातून आशियाई देशांसाठी जाणार्‍या जहाजांद्वारे ५.१ अब्ज डॉलर्स तर युरोपसाठी जाणार्‍या जहाजांमध्ये ४.५ अब्ज डॉलर्सच्या मालवाहतुकीचा समावेश असतो. अशा परिस्थितीत, सुएझ कालव्यातील ही कोंडी अशीच सुरू राहिली तर सुएझ कालव्याच्या दोन्हीकडे जहाजांची मोठी रांग लागेल व अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होईल, अशी चिंता व्यक्त केली जाते.

दरम्यान, पुढील दोन दिवसात ही कोंडी फोडण्याची काही कंपन्या मागणी करीत आहेत. असे झाले नाही तर आपल्या जहाजांना पर्यायी मार्गाचा विचार करावा लागेल, असा इशारा या कंपन्या देत आहेत. —

leave a reply