‘एनएबीएफआयडी’च्या स्थापनेला राज्यसभेची मंजुरी

नवी दिल्ली – देशातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प व विकास यासाठी निधी उपलब्ध करून देणार्‍या ‘नॅशनल बँक फॉर फायनॅन्सिंग इंफ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट बँक’च्या (एनएबीएफआयडी) स्थापनेचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. मंगळवारी लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली होती. या बँकेमुळे देशातील विकासप्रकल्पांची गती वाढेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. या बँकेच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सारी खबरदारी घेण्यात आल्याचे सांगून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत देशाला आश्‍वस्त केले आहे.

ही एनएबीएफआयडी बँक संसदेला उत्तरदायी असेल, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले. देशात पायाभूत सुविधांचे विकासप्रकल्पांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या प्रकल्पांना भासणारा निधीचा तुटवडा ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या असल्याचे मानले जाते. त्या पार्श्‍वभूमीवर, केंद्र सरकारने यासाठी स्वतंत्रपणे निधी उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या वर्षाचा अर्थसंकल्प घोषित करीत असताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एनएबीएफआयडीच्या स्थापनेचे संकेत दिले होते.

मागच्या काही वर्षांपासून देशाच्या बँकिंग क्षेत्राबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाचा समावेश असून याद्वारे सार्वजनिक बँकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारच्या अनेक बँकांची संख्या कमी करून बँक क्षेत्रात सुधारणा घडविण्याचे ध्येय सरकारने समोर ठेवल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून वारंवार सांगितले जाते. त्याचवेळी थकीत कर्जांची वसुली व त्याचे व्यवस्थापन यासाठी स्वतंत्रपणे ‘बॅड बँक’चीही स्थापना करण्याची तयारी झाली आहे. अशा परिस्थितीत ‘एनएबीएफआयडी’च्या स्थापनेला संसदेकडून मिळालेली मंजुरी हा देशाच्या बँकिंग क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. भारताने २०१९ ते २३ या कालावधीत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सुमारे १.४ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. याद्वारे रस्त्यांची उभारणी, रेल्वेचे जाळे, वीजनिर्मिती, बंदरांचा विकास, विमानतळांची निर्मिती यांना वेग दिला जाईल. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो. या क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीचा ओघ अपेक्षित असून यासाठी भारताकडून केल्या जाणार्‍या आवाहनाला परदेशी गुंतवणुकदारांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.

या पार्श्‍वभूमीवर, पायाभूत सुुविधा क्षेत्राच्या विकासासाठी उभारण्यात येत असलेली एनएबीएफआयडी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणार असल्याचा दावा केला जातो. गुंतवणूकदार कित्येक वर्षांपासून अशा बँकेच्या प्रतिक्षेेत होते, असा दावा काही अर्थतज्ज्ञांनी केला आहे.

leave a reply