भारताच्या हवामान बुलेटिनमध्ये पीओकेचाही समावेश

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या सरकारने गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणुकीचे आयोजन करावे, असे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र हा पाकिस्तानचा भूभाग नसून भारताचा भूभाग आहे याची आठवण करून देऊन भारताने पाकिस्तानला हा भाग रिकामा करण्याची सूचना केली होती. याला काही दिवस उलटत नाही तोच भारताच्या हवामान विभागाने गिलगिट बाल्टिस्तान व मुजफ्फराबाद या पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा आपल्या बुलेटीनमध्ये समावेश केला आहे. हा भारताचाच भाग असल्याने सदर निर्णय घेण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

भारताने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने देखील पीओकेवरील आपला अवैध ताबा अधिकृतरीत्या पाकिस्तानमध्ये घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश म्हणजे पाकिस्तानच्या कुटील कारवायांचा भाग ठरतो. भारताने याची तातडीने दखल घेतली असून या प्रकरणी भारताने पाकिस्तानला समन्स बजावले. तसेच गिलगिट बाल्टिस्तानसह पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, याची जाणीव भारताचे राजकीय व लष्करी नेतृत्व पाकिस्तानला वारंवार करून देत आले आहे. यापुढे भारत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानशी चर्चा करेल ती केवळ पीओके पुरतीच मर्यादित असेल, असे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी बजावले होते. तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पीओके वर पुन्हा भारताचा सार्वभौम अधिकार प्रस्थापित होईल,असा विश्वास व्यक्त करून लवकरच ही बाब प्रत्यक्षात उतरेल असा दावा केला होता.

या पार्श्वभूमीवर भारताच्या हवामान विभागाने आपल्या बुलेटीनमध्ये गिलगिट बाल्टिस्तान व पीओकेची राजधानी असलेल्या मुजफ्फराबादचा समावेश करून पाकिस्तानची झोप उडविली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारत पीओकेचा ताबा घेण्याची तयारी करीत असल्याचा आरोप पाकिस्तानचे माध्यमे करीत आहेत. काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराची आक्रमकता पाहता पीओके वर हल्ला होणारच, अशी भीती पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी व सामाजिक विश्लेषक व्यक्त करीत आहेत. त्याचवेळी भारताच्या आक्रमणाला उत्तर देण्याची तयारी व क्षमता पाकिस्तानकडे नसल्याचा निर्वाळाही यातील काही माजी लष्करी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

इतकेच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये भारत बनावट दहशतवादी हल्ल्याचा बहाणा करून पाकिस्तान वर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला आहे . आंतरराष्ट्रीय समुदायाने याची नोंद घ्यावी ,असे आवाहन देखील इम्रान खान यांनी केले होते. याआधीही अनेकवार भारत पाकिस्तानवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचे दावे करून इम्रान खान यांनी खळबळ माजविण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचे हे सारे प्रयत्न अपयशी ठरले होते. यावेळीही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या दाव्याकडे कुणीही लक्ष दिले नाही.

leave a reply