नव्या वर्षातही कोरोना साथीची तीव्रता कायम

-अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह चीनमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढले

वॉशिंग्टन/लंडन/बीजिंग  – दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही कोरोनाच्या साथीची तीव्रता अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेसह ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये विक्रमी रुग्णसंख्या नोंदविण्यात येत असून चीनमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे आढळले आहे. आखाती देशांमधील सौदी अरेबिया व युएईमध्येही रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली असून सौदी अरेबियात प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांची संख्या हजारांवर गेली आहे. इस्रायलमध्ये ‘फ्ल्यू` व ‘कोरोना`चा एकत्रित संसर्ग असलेल्या ‘फ्लोरोना`चा रुग्ण आढळल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

कोरोना साथीची तीव्रताचीनमध्ये 2019 साली सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीला दोन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र त्यानंतरही साथीची तीव्रता अद्याप कमी झालेली नाही. उलट अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याचे समोर येत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन असणाऱ्या ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट`मुळे ही रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून या व्हेरिअंटच्या फैलावाला सुरुवात झाली होती.

शनिवारी अमेरिकेत सुमारे पाच लाख रुग्ण आढळले असून 1,235 जण दगावले आहेत. न्यूयॉर्क व फ्लोरिडामध्ये रुग्णसंख्येचे नवे विक्रम नोंदविले गेले आहेत. न्यूयॉर्कमध्ये 24 तासात 85 हजार 476 तर फ्लोरिडामध्ये सुमारे 76 हजार रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी न्यूजर्सी, कॅलिफोर्निया व टेक्सासमध्येही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेल्या माहितीत दर आठवड्याला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 25 लाखांपर्यंत जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसात सातत्याने वाढणाऱ्या या रुग्णसंख्येमुळे उद्योगक्षेत्र व अर्थव्यवस्थेला फटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. शनिवारी अमेरिकेतील विमानकंपन्यांनी अडीच हजारांहून अधिक हवाई फेऱ्या रद्द केल्या. विविध प्रांत व शहरांनी लागू केलेल्या नव्या नियमांमुळे हॉटेल व पर्यटन उद्योगालाही धक्के बसू लागले आहेत. ‘ओमिक्रॉनचा संसर्ग अमेरिकेत सर्व ठिकाणी पसरतो आहे. या वाढत्या फैलावामुळे पुढील महिन्यात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला शटडाउनला सामोरे जावे लागू शकते. हा शटडाऊन प्रशासनाच्या धोरणांमुळे नाही तर कोट्यावधी अमेरिकी नागरिक संसर्गाने आजारी असल्यामुळे उद्भवेल`, अशी भीती ब्राऊन युनिव्हिर्सिटीतील आरोग्य तज्ज्ञ डॉ. मेगन रॅनी यांनी व्यक्त केली.

अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व पूर्व युरोपिय देशांमध्येही कोरोनाची तीव्रता वाढते आहे. शनिवारी ब्रिटनमध्ये एक लाख, 62 हजार, 572 रुग्णांची नोंद झाली असून 154 रुग्णांचा मृत्यू झाला. जर्मनीत गुरुवारी व शुक्रवारी 63 हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 72 लाखांवर पोहोचली आहे. फ्रान्समध्ये गेले चार दिवस सातत्याने रुग्णांची संख्या दोन लाखांहून अधिक नोंदविण्यात येत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे फ्रान्समधील एकूण रुग्णसंख्या एक कोटींवर जाऊन पोहोचली आहे. जगात एक कोटींहून अधिक रुग्णसंख्या असणारा फ्रान्स हा सहावा देश ठरला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे फ्रान्समध्ये आतापर्यंत एक लाख, 21 हजारांहून अधिक जण दगावले आहेत.

कोरोना साथीची सुरुवात झालेल्या चीनमध्येही रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. 2021 सालच्या अखेरच्या आठवड्यात चीनमध्ये 1,151 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर इतक्या कमी दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची चीनमधील ही पहिलीच वेळ ठरली आहे. चीनच्या शिआन शहरातील एकूण रुग्णसंख्या दीड हजारांनजिक पोहोचली आहे. पुढील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांच्या पार्श्‍वभूमीवर ही वाढती रुग्णसंख्या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीसाठी नवी डोकेदुखी ठरु शकते.

leave a reply