अमेरिका-इस्रायल इराणविरोधात भयगंडाचा वापर करून अस्थैर्य माजवित आहेत

- इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप

अस्थैर्य माजविततेहरान – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या इस्रायल व सौदी अरेबियाच्या भेटीत इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्याचवेळी अमेरिका आखाती क्षेत्रातून माघार घेऊन हे क्षेत्र रशिया, चीन किंवा इराणसाठी मोकळे सोडणार नाही, असा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला होता. तसेच इराणपासून आखाती देशांना संभवणाऱ्या धोक्याकडे अमेरिका अतिशय गंभीरपणे पाहत असल्याचे आश्वासनही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिले होते. त्यावर इराणची प्रतिक्रिया आली आहे. अमेरिका व इस्रायल मिळून आपल्या विरोधात भयगंड पसरवून अस्थैर्य माजवित असल्याचा आरोप इराणने केला आहे.

अमेरिका पुन्हा एकदा आखाती क्षेत्रात अस्थैर्य माजविण्याचा प्रयत्न करीत असून यासाठी इराणच्या विरोधात भयंगडाचा वापर करीत आहे, असा ठपका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी ठेवला. इराणला अणुबॉम्ब मिळविण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका व इस्रायल आखाती देशांची आघाडी उभी करीत आहेत. पण इराण अणुबॉम्ब विकसित करण्यासाठी प्रयत्न करीत नाही, असा निर्वाळा नासेर कनानी यांनी दिला. इराणवर दोषारोप करीत असताना अण्वस्त्रसज्ज असलेल्या इस्रायलकडे मात्र अमेरिका दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करून अमेरिका ढोंगी व दुटप्पी असल्याचा दावा कनानी यांनी केला.

इराणला धमक्या देणाऱ्या अमेरिका व इस्रायलला, इराणवरील हल्ल्याची किती मोठी किंमत चुकती करावी लागेल याची जाणीव आहे, असे इराणच्या संरक्षणदलांचे प्रवक्ते अबोलफझल शेकरची यांनी म्हटले आहे. इराणला धमक्या देण्याच्या आधी तुमच्या लष्कराकडे नीट पहा, पर्शियन आखातात इराणसमोर त्यांची अवस्था बिकट होईल, असा इशारा शेकरची यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून इराणची अमेरिकेच्या विरोधातील भाषा अधिकाधिक जहाल बनत चालली आहे. अणुकरारावरील वाटाघाटीदरम्यान इराणने काहिशी संयमी भूमिका स्वीकारली होती. पण आता इराणचे परराष्ट्र मंत्रालय व वरिष्ठ अधिकारी अमेरिकेला थेट इशारे देऊ लागले आहेत.

यामुळे अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी इराणबरोबर केलेला अणुकरार निकालात निघाल्याचे दिसते आहे. त्याचवेळी इस्रायल व आखाती देशांनी इराणच्या विरोधात उभारलेल्या आघाडीच्या मागे उभे राहून अमेरिकेने इराणवरील लष्करी दडपण प्रचंड प्रमाणात वाढविल्याचे दिसते आहे. अशा परिस्थितीत इराण पुन्हा एकदा अधिकच आक्रमक बनला असून यामुळे इराणच्या विरोधातील इस्रायल व अरब देशांमधील ऐक्य अधिकच भक्कम बनत चालले आहे. अमेरिकेचा या आघाडीतील सक्रीय सहभाग इराणच्या चिंता वाढविणारी बाब ठरत आहे.

leave a reply