भारतात अस्थैर्य माजवू पाहणार्‍या पाकिस्तानला दणके बसतील

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

पित्तोरगड – ‘पाकिस्तान नेहमीच भारतात अस्थैर्य माजविण्याचा प्रयत्न करीत आला आहे. पण आता हे प्रयत्न यशस्वी ठरणार नाहीत. यापुढे पाकिस्तानने असे प्रयत्न केलेच, तर केवळ सीमेवर हल्ला चढवून भारत स्वस्थ बसणार नाही. तर सर्जिकल स्ट्राईकसोबत भारत एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला दणके देईल’, असा थेट इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला. पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी भारतीय सैन्यावर हल्ले चढविण्यासाठी काश्मिरींना चिथावणी देत आहेत. त्याचवेळी भारतात अस्थैर्य माजविण्याच्या कारस्थानावर पाकिस्तानने काम सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. भारत याची गंभीर दखल घेत असल्याचा इशारा संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला दिला आहे.

भारतात अस्थैर्य माजवू पाहणार्‍या पाकिस्तानला दणके बसतील - संरक्षणमंत्री राजनाथ सिंगकाश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळून प्रवास करू नका, अशी सूचना अमेरिकेने आपल्या भारतात असलेल्या नागरिकांना दिली. काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये संघर्ष भडकू शकतो, अशी शक्यता वर्तवून अमेरिकेने आपल्या नागरिकांना ही सूचना केली होती. सध्या नियंत्रण रेषेवर तुलनेने शांतता असली तरी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून घुसखोरी करण्यासाठी दहशतवादी टपून बसल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी जम्मू व काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाकिस्तानने सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे. याद्वारे जम्मू व काश्मीरचा विकास रोखण्याचा कट पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयने आखला आहे.

या पार्श्‍वभूमीवर, संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सज्जड इशारा दिला. भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईक करताना कचरणार नाही, असे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला परिणामांची जाणीव करून दिली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला होता. पाकिस्तानात सध्या अंतर्गत राजकीय संकट खडे ठाकले असून पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार धोक्यात आले आहे. पाकिस्तानच्या लष्कराबरोबरील विसंवाद झाल्याने इम्रान खान यांचे पंतप्रधानपद आता काही दिवसांपुरतेच मर्यादित असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानच्या लष्करानेच इम्रान खान यांना सत्तेवर आणले, पण त्यांचे सरकार दारूण अपयशी ठरले. या सरकारमुळेच पाकिस्तानात भयंकर महागाईचे थैमान सुरू आहे व इतर कुठल्याही आघाडीवर या सरकारला यश मिळालेले नाही.

या अपयशाचे खापर पाकिस्तानच्या लष्करावरच फुटत असून यातून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर धडपडत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी लष्कराच्या माजी अधिकार्‍यांनी भारताविरोधात गरळ ओकण्याची नव्याने सुरूवात केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी जम्मू व काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर हल्ले चढविण्याची चिथावणी इथल्या जनतेला देत आहेत. त्याखेरीज काश्मीरची सुटका होणार नाही, असा दावा पाकिस्तानच्या या माजी लष्करी अधिकार्‍यांनी केला होता. यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया तीव्र करणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्याचवेळी भारतातील विघटनवाद्यांचे सहाय्य घेऊन शक्य तितके अस्थैर्य माजविण्याच्या कारस्थानावर पाकिस्तान काम करीत असल्याचे उघड झाले आहे. आत्ताचा अधिक सामर्थ्यशाली भारत हे खपवून घेणार नाही, असे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला १९७१ सालच्या युद्धातील पराभवाची आठवण करून दिली.

leave a reply