रशियाने 2020च्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला

- आरोप करणार्‍या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेकडून चीनला क्लिन चीट

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणखी एक हल्ला चढविला आहे. 2020 सालच्या निवडणुकीत ट्रम्प यांना सहाय्य करण्यासाठी रशियाने हस्तक्षेप केला होता, असा आरोप अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केला आहे. मात्र याचे पुरावे उपलब्ध नसल्याचा अजब दावा या यंत्रणेने केला. त्याचवेळी चीनने मात्र अमेरिकेच्या निवडणुक प्रक्रियेत हस्तक्षेप केलेला नाही, असे सांगून गुप्तचर यंत्रणेने चीनला क्लिन चीट दिली. यामुळे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन रशियाविरोधी व चीनधार्जिणे परराष्ट्र धोरण राबविणार असल्याच्या आरोपांना अधिकच बळ मिळत आहे. रशियन माध्यमांनी यावरून बायडेन प्रशासनावर सडकून टीका केली आहे.

अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ने मंगळवारी 15 पानाचा अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये 2020 साली पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीला परदेशी हस्तकांकडून धोका होता, असे म्हटले आहे. रशिया, इराण, व्हेनेझुएला आणि क्यूबा या देशांनी गेल्या वर्षाची निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने या अहवालातून केला आहे. यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दोषी धरले आहे.

अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप करून माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बाजूने निवडणुकीचे निकाल प्रभावित करण्याचे आदेश रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिले होते. पण रशियाने सदर निवडणूक प्रभावित किंवा मतदानात फेरफार केल्याचे किंवा मतदारांच्या यादीत गडबड केल्याचे कुठलेही पुरावे सापडले नसल्याचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. तर इराणने ट्रम्प यांच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

याआधी 2016 च्या निवडणुकीतही डेमोक्रॅट पक्षाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर असेच आरोप केले होते. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करून ट्रम्प यांना जिंकवून दिल्याचा आरोप केला होता. पण अमेरिकन गुप्तचर यंत्रणा तसेच डेमोक्रॅट पक्ष याचे पुरावे सादर करण्यात असमर्थ ठरले होते.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन येत्या काही तासात चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत. उभय देशांमधील बिघडलेले व्यापारी संबंध सुरळीत करण्यासाठी ही चर्चा होणार आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा हा अहवाल प्रसिद्ध झाल्याचे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत.

दरम्यान, अमेरिकेबरोबर व्यापार युद्धाची झळ पोहोचलेला चीन बायडेन यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी प्राधान्य देईल, अशी टीका माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या वर्षीच्या निवडणूक प्रचारात केली होती.

leave a reply