पाकिस्तानी लष्कराचा दहशतवादविरोधी विभागाचा तळ तेहरिकच्या ताब्यात

10 जवान ओलीस ठेवून तेहरिकची पाकिस्तानसमोर मागणी

pakistan police compundइस्लामाबाद – तेहरिक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या लष्कराची प्रतिष्ठा पुन्हा एकदा धुळीला मिळविली. खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील पाकिस्तानी लष्कराच्या दहशतवादविरोधी विभागाचा तळ तेहरिकच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेऊन येथील जवानांना ओलीस ठेवले आहे. यामध्ये मेजर पदावरील अधिकाऱ्याचा समावेश असून त्याचा व्हिडिओ तेहरिकने प्रसिद्ध केला. त्याचबरोबर पाकिस्तानच्या ताब्यातील आपल्या साथीदारांच्या सुरक्षित सुटकेसाठी हेलिकॉप्टर पुरविण्याची मागणी तेहरिकने पाकिस्तानसमोर ठेवली आहे.

गेल्या महिन्यात पाकिस्तान व तेहरिकमधील संघर्षबंदी निकालात निघाली. त्यानंतर तेहरिकने खैबर-पख्तूनख्वा, वझिरीस्तान प्रांतात पाकिस्तानी लष्कर व आयएसआयच्या एजंट्सवरील हल्ले वाढविले आहेत. रविवारी रात्री खैबर-पख्तूनख्वा येथील बानू कँटाँमेंट भागातील पाकिस्तानी लष्कराचा तळ तेहरिकच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतला. यावेळी झालेल्या संघर्षात पाकिस्तानी लष्कराचे आठ जवान ठार झाले.

Tehrik's custodyहा दहशतवादविरोधी विभागाचा हा तळ असल्याचे उघड झाल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराचे हसे झाले आहे. ‘जगातील नंबर एक’ म्हणून मिरविणाऱ्या आपल्या लष्कराला स्वत:चेच लष्करी तळ संरक्षित करता येत नसल्याची टीका पाकिस्तानातील पत्रकार व जनता करीत आहे. पंतप्रधान शाहबाझ शरीफ अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाला शुभेच्छा देण्यासाठी मोकळे आहेत, पण आपल्याच जवानांना ओलीस ठेवण्याच्या प्रकाराबाबत बोलायला तयार नाहीत, अशी नाराजी पाकिस्तानी पत्रकार व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, पाकिस्तानच्या भूमीतूनच पाकिस्तानच्या लष्करावर हल्ले करीत असल्याची घोषणा तेहरिकचा प्रमुख नूर वली मेहसूद याने केली आहे. याबरोबरच तेहरिक अफगाणिस्तानातून हल्ले चढवित असल्याचे पाकिस्तानचे आरोप नूर वली मेहसूदने फेटाळले. त्याचबरोबर अल कायदाचा प्रमुख अयमन अल जवाहिरीला लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने ड्रोनचा वापर केला होता. तेहरिकच्या नेत्यांबाबत तशी पुनरावृत्ती करण्याचा प्रकार केलाच तर ते अमेरिकेच्या भल्याचे नसेल, अशी धमकी तेहरिकच्या प्रमुखाने दिली.

हिंदी

leave a reply