‘एससीओ’च्या बैठकीसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग ताश्कंदमध्ये दाखल

SCO-meetingताश्कंद/नवी दिल्ली – चीन, रशिया व भारतासह मध्य आशियाई देशांचा समावेश असणाऱ्या ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ) बैठकीसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी उझबेकिस्तान तसेच कझाकस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संरक्षण सहकार्यासह इतर मुद्यांवर चर्चा केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तीन दिवसांच्या ताश्कंद दौऱ्यावर आहेत.

पुढील महिन्यात ‘एससीओ’ची वार्षिक बैठक पार पडणार आहे. त्यापूर्वी या गटाचे सदस्य असलेल्या देशांच्या परराष्ट्र तसेच संरक्षणमंत्र्यांची बैठक घेण्यात येत आहे. गेल्या महिन्यात ताश्कंदमध्ये ‘एससीओ’च्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता संरक्षणमंत्र्यांची बैठक होत असून यात रशिया तसेच चीनचे संरक्षणमंत्रही सहभागी होणार आहेत.

रशिया-युक्रेन युद्ध, अफगाणिस्तान व क्षेत्रिय पातळीवरील आव्हाने या मुद्यांवर ‘एससीओ’च्या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तीन दिवसांच्या परिषदेदरम्यान भारताचे संरक्षणमंत्री रशियन संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply