युक्रेनच्या वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

संशयास्पद मृत्यूकिव्ह – युक्रेनची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘एसबीयू’चे वरिष्ठ अधिकारी ओलेक्झांडर नॅकोनेश्नी यांचा मृत्यू झाला आहे. नॅकोनेश्नी हे मध्य युक्रेनमधील किरोवोग्रॅड प्रांतातील गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. शनिवारी रशियात राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे निकटवर्तिय असणाऱ्या अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी दारिआ दुगिन हिची हत्या घडविण्यात आली होती. त्यानंतर नॅकोनेश्नी यांच्या मृत्यूचे वृत्त समोर आल्याने ही घटना लक्ष वेधणारी ठरली आहे.

संशयास्पद मृत्यूशनिवारी रात्री किरोवोग्रॅडची राजधानी क्रोपिव्हनिट्स्कीमधील घरात नॅकोनेश्नी यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृतदेहावर गोळ्या झाडल्याच्या जखमा आहेत. नॅकोनेश्नी यांच्या पत्नीने त्यांच्या मृत्यूची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. स्थानिक राजकीय नेत्याने नॅकोनेश्नी यांनी आत्महत्या केल्याचा दावा सोशल मीडियावर केला. मात्र सुरक्षायंत्रणांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. ओलेक्झांडर नॅकोनेश्नी जानेवारी 2021पासून ‘एसबीयू’ या गुप्तचर यंत्रणेचे स्थानिक प्रमुख म्हणून कार्यरत होते. गेल्याच महिन्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख तसेच ‘प्रॉसिक्युटर जनरल’ची हकालपट्टी केली होती. या दोन्ही विभागातील अनेक अधिकारी रशियन गुप्तचर यंत्रणेसाठी काम करीत असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला होता. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केल्याचेही त्यांनी बजावले होते.

दरम्यान, शनिवारी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या दारिआ दुगिन यांच्या हत्येमागे युक्रेनी यंत्रणांचा हात असल्याचा दावा रशियाने केला. अलेक्झांडर दुगिन व दारिआ दुगिनची हत्या करण्यासाठी युक्रेनी एजंट मॉस्कोत दाखल झाला होता. स्फोटानंतर सदर एजंटने इस्टोनिआमार्गे पळ काढल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

leave a reply