पाकिस्तान-चीन योजनाबद्धरित्या भारताच्या सीमेवर तणाव वाढवत आहेत

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

सीमेवर तणावनवी दिल्ली – ”पाकिस्तान आणि चीन हे भारताचे दोन्ही शेजारी देश योजनाबद्धरित्या सीमेवर तणाव निर्माण करीत आहेत. मात्र उत्तर आणि पूर्व सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारत समर्थपणे सामना करीत आहे. या आघाड्यांवर तोंड देत असताना भारत आपला विकास साधून सीमाभागात ऐतिहासिक बदल घडवित आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. सीमावर्ती राज्यांमधील सामरिकदृष्टया महत्त्वाच्या ४४ पुलांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन करताना संरक्षणमंत्री देशाला संबोधित करीत होते. याशिवाय अरुणाचल प्रदेशमधील चीन सीमेजवळील ‘नेचिपु’टनेलची आधारशीलाही संरक्षणमंत्र्यांनी ठेवली.

लडाख, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांसह अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यातील सीमाभागात महत्वाच्या पायभूत सुविधांच्या प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ने (बीआरओ) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळातही या पुलाचे बांधकाम केल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलेल्या ४४ पुलांमध्ये अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंमधील प्रत्येकी आठ पुलांचा समावेश आहे. याशिवाय लडाखमध्येही आठ पूल उभारण्यात आले आहेत. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये दहा पूल उभारले असून सिक्कीममध्ये चार, पंजाबमध्ये चार आणि हिमाचल प्रदेशमध्ये दोन पुलांचा यामध्ये समावेश आहे.

सीमेवर तणाव

यामुळे लष्कराला एलएसी आणि एलओसीपर्यंत जवान आणि लष्करी साहित्याची वाहतूक जलदगतीने करता येईल. भारतीय लष्कराचे अवजडवाहू रणगाडेही या पुलांवरून जाऊ शकतात, असे , असे बीआरओच्या अधिकांऱ्यानी म्हटले आहे. तसेच लडाखमध्ये आणखी ४५ पुलांचे काम सुरु असल्याची माहिती ‘बीआरओ’च्या अधिकाऱ्यांनी दिली. या पुलांचा लष्कराबरोबरच सर्वसामान्यांनाही लाभ होईल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘या भागात मोठ्या प्रमाणावर लष्कराचे जवान तैनात आहेत. वर्षभर त्यांना वाहतूक सेवा उपलब्ध नसते. धोरणात्मकदृष्टया या पुलांची देशाला गरज आहेच. पण त्याबरोबरच देशाच्या विकासाच्या दृष्टीने याला महत्त्व आहे’, असे संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले.

सीमेवर तणाव

या व्हर्च्युअल कर्यक्रमात जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. या पुलांमुळे उत्तराखंडच्या दुगर्म भागातली कनेक्टिव्हिटी वाढेल. तसेच या पुलांचा कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंना याचा लाभ होईल, असा विश्वास यावेळी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील ‘बालिपारा चारदुर तवांग’ रोडवर ४५० मीटर लांब ‘नेपिचु’ टनेल उभारण्यात येणार आहे. यामुळे चीन सीमेपर्यंतचे अंतर १० किलोमीटरने कमी होईल, असा दावा केला जातो. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते व्हर्च्युअली या भुयारी मार्गाचा पायभरणी कार्यक्रमही पार पडला.

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना भारताची ७००० किलोमीटरची सीमा रेषा लागून असून सध्या या दोन्ही आघाड्यांवर प्रचंड तणाव आहे. भारताकडूनही या दोन्ही आघाड्यांवर एकचवेळी संघर्षाची तयारी करण्यात आल्याचे संकेत लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने भारत आणि चीनला लागून असलेल्या सीमा भागात व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाना प्रचंड वेग देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

leave a reply