भारत लवकरच रफायलद्वारे पाकिस्तानवर हल्ला चढविल

- पाकिस्तानच्या हवाईदलप्रमुखांची चिंता

इस्लामाबाद – ‘येत्या काही महिन्यात आपल्या ताफ्यातील रफायल विमानांचा वापर करुन भारत पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर हल्ला चढविल’, अशी चिंता पाकिस्तानच्या हवाईदलप्रमुखांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी हवाईदलाची लढाऊ विमाने पीओके, कराची, लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडीवर घिरट्या घालून भारताच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्याची तयारी करीत असल्याचे वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या हवाईदलप्रमुख मुजाहिद अन्वर खान यांनी व्यक्त केलेली भीती पाकिस्तानची मानसिक अवस्था कथन करीत आहे.

पाकिस्तानवर हल्ला

‘सेंटर फॉर एअरोस्पेस अँड सिक्युरिटी स्टडीज् इन पाकिस्तान’च्या व्यासपीठावरुन बोलताना पाकिस्तानच्या वायुसेनाप्रमुखांनी पाकिस्तानचे संरक्षणदल आणि इम्रान खान सरकारला जाणवत असलेली भीती बोलून दाखविली. गेल्या महिन्यात फ्रेंच बनावटीची रफायल विमाने भारताच्या वायुसेनेत दाखल झाली असून पुढच्या वर्षभरात ही रफायल विमाने मॅटिओर क्षेपणास्त्रांनी सज्ज होतील. रफायल विमाने मॅटिओर क्षेपणास्त्रांनी सज्ज झाल्यानंतर, पुढच्या १८ ते २४ महिन्यांमध्ये भारत पाकिस्तानवर हल्ला चढविल, असा दावा वायुसेनाप्रमुख मुजाहिद खान यांनी केला. या मॅटिओर क्षेपणास्त्रांमुळे रफायल विमाने पाच किलोमीटर अंतर राखून पाकिस्तानातील वेगवेगळ्या टार्गेट्सवर एकाचवेळी हल्ले चढवू शकतात. आपल्या वायुसेनेचे वर्चस्व गाजविण्यासाठी भारत नक्की ही कारवाई करील, अशी भीती पाकिस्तानच्या वायुसेनाप्रमुखांनी वर्तविली. तर भारत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडूनही हल्ले चढवू शकतो, असा आरोप वायुसेनाप्रमुखांनी यावेळी केला.

पाकिस्तानवर हल्लागेल्या आठवड्यातच वायुसेना दिनाच्या निमित्ताने भारतीय वायुसेनाप्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी रफायल विमानांचा उल्लेख केला होता. रफायल विमानांच्या वायुसेनेतील समावेशामुळे भारताच्या फर्स्ट स्ट्राईकच्या क्षमतेत वाढ झाल्याचे एअर चीफ मार्शल भदौरिया यांनी म्हटले होते. त्याचबरोबर ही विमाने शत्रूच्या सीमेत हवाई हद्द न ओलांडताही दूरवर हल्ले चढवू शकतात, याची आठवण भारताच्या वायुसेनाप्रमुखांनी करुन दिली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या वायुसेनाप्रमुखांचे हे विधान समोर आले आहे.

गेल्या चोवीस तासात पाकिस्तानच्या प्रमुख शहरांमध्ये तसेच नियंत्रणरेषेजवळच्या पाकिस्तानी वायुसेनेच्या हालचाली वाढल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या वायुसेनेतील साब ग्रिपेन तसेच एफ-१६ लढाऊ विमाने लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडीच्या हवाईहद्दीत घिरट्या घालत असल्याचे जगभरातील विमानांच्या हवाई उड्डाणांवर नजर ठेवणार्‍या एका संकेतस्थळवरुन उघड झाले आहे. तर गेल्याच आठवड्यात पाकिस्तानच्या वायुसेनेने लाहोरच्या महामार्गावर एफ-१६ विमाने उतरविण्याचा तातडीचा सरावही घेतला होता.

leave a reply