जगभरात चोवीस तासात कोरोनाचे साडेपाच हजाराहून अधिक बळी

बाल्टिमोर – कोरोनाव्हायरसमुळे गेल्या चोवीस तासात जगभरात ५,५८४ जणांचा बळी गेला असून जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या २,७३,३६५ वर पोहोचली आहे. जगभरात गुरुवारी ९६ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली असून जगात सध्या ३९,६४,८७९ रुग्ण असल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली.

लॉकडाउन शिथिल करणाऱ्या अमेरिका व पाश्चिमात्य देशांमधील कोरोनाच्या बळींच्या तसेच नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत २,४०० हून अधिक जणांचा बळी गेला असून अमेरिकेतील एकूण कोरोनाच्या बळींची संख्या ७७,५५९ वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत ३० हजार नव्या रुग्णांची भर पडली असून अमेरिकेत या साथीचे एकूण १२,९९,७७२ रुग्ण आहेत.

गेल्या चोवीस तासात युरोपात या साथीने १,८३० जण दगावले असून युरोपमधील कोरोनाच्या बळींची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. तर गुरुवारी युरोपात कोरोनाचे २८,७९६ नवे रुग्ण आढळले असून युरोपातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६,२७,७१५ वर पोहोचली आहे. ब्रिटनमधील या साथीच्या बळींची संख्या वेगाने वाढत असून गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये ५३९ तर इटलीत २७४ आणि स्पेनमध्ये २१३ जणांचा कोरोनाने बळी गेला. तर गुरुवारी फ्रान्समध्ये १७८, जर्मनीत ११७ आणि स्वीडनमध्ये ९९ जणांचा मृत्यू झाला आहे.

या महामारीने आखाती क्षेत्रात १२,२२४ जणांचा बळी गेला असून इराणमध्ये सर्वाधिक ६,४८६ तर तुर्की

त ३,६४१ जण या साथीमुळे दगावले आहेत. लॅटीन अमेरिकेत कोरोनाव्हायरसमुळे १३,५९६ जण मृत्यूमुखी पडले असून ब्राझिलमध्ये ९,१९० आणि इक्वेडोरमध्ये १,६५४ जणांचा बळी गेला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचे मृतदेह ठेवण्यासाठी शवागरेही कमी पडू लागली आहेत. तर रशियात या साथीने आतापर्यंत १,६२५ जणांचा बळी घेतला असून रशियातील कोरोनाबाधितांची संख्या १,७७,१६० वर गेली आहे. गुरुवारी रशियात अकरा हजार नवे रुग्ण आढळले.

दरम्यान, आफ्रिकेत या महामारीने २,०८३ जणांचा बळी घेतला असून कोरोनाचे ५५ हजाराहून अधिक रुग्ण असल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. पण पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आफ्रिकेतील परिस्थिती भीषण स्तरावर पोहोचू शकते. या साथीवर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर आफ्रिकेतील साथ जवळपास एक ते दोन लाख जणांचा बळी घेईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे.

leave a reply