अंतराळक्षेत्र व संरक्षण विभागासाठी अमेरिका ‘मिनी न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर’ विकसित करणार

- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वटहुकूम

वॉशिंग्टन – अमेरिकेने अंतराळातील संशोधनासाठी तसेच संरक्षण विभागासाठी ‘मिनी न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर’ विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात वटहुकूम जारी केला असून अणुऊर्जा व त्याचा वापर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित मुद्दा असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये ट्रम्प यांनी ‘स्पेस न्यूक्लिअर सिस्टिम’साठी हालचाली सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गेल्याच महिन्यात अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ला चंद्रावर अणुभट्टी उभारण्याची परवानगी देण्यात आली होती.

‘अमेरिकेतील अणुऊर्जा क्षेत्राला चालना देणे हा नव्या वटहुकुमाचा उद्देश आहे. हे करतानाच अमेरिकेतील अंतराळ संशोधन कार्यक्रमाला पुनरुज्जीवित करणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी ऊर्जेचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अंतराळातीळ संशोधनासाठी तसेच संरक्षणक्षेत्रासाठी छोट्या अणुभट्ट्यांच्या माध्यमातून अणुऊर्जेचा वापर करून तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकेचे वर्चस्व कायम ठेवण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यात येईल’, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या वटहुकुमात म्हटले आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून सध्या दोन वेगवेगळ्या योजनांअंतर्गत ‘मिनी न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर’ विकसित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘प्रोजेक्ट पेले’ अंतर्गत संरक्षण विभागाने तीन कंपन्यांना ‘मोबाईल न्यूक्लिअर रिअ‍ॅक्ट्र प्रोटोटाईप’वर काम सुरू करण्याचे कंत्राटा जारी केले होते. तर दुसर्‍या योजनेंतर्गत २०२३ सालापर्यंत ऊर्जा विभागाच्या सहाय्याने छोट्या अणुभट्टीची चाचणी घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अमेरिकेत अणुऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणार्‍या ‘वेस्टिंगहाऊस’ या कंपनीने ‘इव्हिन्सी’ नावाने ‘मायक्रो रिअ‍ॅक्टर’ विकसित केला असून त्याच्या चाचण्या सुरू असल्याचे मानले जाते.

गेल्याच महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी महत्त्वाचे ‘एसपीडी-६’ धोरण जाहीर केले होते. या धोरणाअंतर्गत ‘स्पेस न्यूक्लिअर पॉवर अँड प्रॉपल्शन’चा (एसएनपीपी) लागू करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार, भविष्यात ‘स्पेस न्यूक्लिअर सिस्टिम’वर आधारीत अंतराळमोहिम राबविण्यावर ‘नासा’ काम करणार आहे. पर्यायी ऊर्जास्त्रोत अपुरे पडत असताना, अंतराळ मोहिमांसाठी अंतराळातच अणुऊर्जेवर आधारीत अंतराळयान प्रक्षेपण करण्याची नासाची योजना आहे. अमेरिकेच्या या योजनेवर चीन व रशियाने टीकास्त्र सोडले असून चंद्राला अण्वस्त्रनिर्मितीचे केंद्र बनविण्याची योजना असल्याचा आरोप करण्यात आला होता.

leave a reply