हुकूमशाही सैन्याने तैवानला घेरले आहे

- तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन

हुकूमशाहीतैपेई – ‘हुकूमशाही लष्कर सारे नियम पायदळी तुडवून दररोज तैवानच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन करीत आहे. तैवानच्या सभोवती भक्कम वेढा घालण्याची तयारी सुरू असून हे सारे दैनंदिन पातळीवर तैवान सहन करीत आहे’, अशी जळजळीत टीका तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई इंग-वेन’ यांनी केली. चीनचा थेट उल्लेख टाळून तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली ही टीका म्हणजे चीनच्या धमक्यांना दिले जाणारे प्रत्युत्तर ठरते. अमेरिकेने तैवानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, चीनने तैवानला धमक्या देण्याचे सत्र सुरू केले आहे. त्याला राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन व तैवानच्या परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी उत्तर दिले आहे.

“‘साऊथ चायना सी’, ‘ईस्ट चायना सी’मधील चीनच्या आक्रामक हालचाली, भारताबरोबर लडाखच्या सीमेवर चीनने केलेल्या कुरापती आणि हाँगकाँगमधील निदर्शकांवरील कारवाई म्हणजे चीनच्या महत्त्वाकांक्षी विस्तारवादी धोरणाचे पुरावे आहेत. तैवान चीनचे यापुढील लक्ष्य आहे. तैवान चीनचे भक्ष्य ठरू नये, असे वाटत असेल तर अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोप या देशांनी एकत्र यावे. अन्यथा चीनचा पॅसिफिक क्षेत्रातील प्रभाव वाढेल आणि त्याचा परिणाम जागतिक व्यवस्थेवर होईल”, असा इशारा तैवानचे परराष्ट्रमंत्री ‘जोसेफ वू’ यांनी दिला.

हुकूमशाही

ब्रिटनच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी चीन आपली हुकूमशाही व्यवस्था तैवानवर लादण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला. चीनला रोखायचे असेल तर चीनच्या विस्तारवादी धोरणाविरोधात आवाज उठविणाऱ्या समविचारी देशांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले. पुढच्या काही वर्षांमध्ये चीन तैवानवर हल्ला चढवू शकतो. यासाठीच तैवान अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रखरेदी करीत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री वू यांनी दिली.

हुकूमशाहीचीनच्या हुकूमशाहीकडे तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई आणि परराष्ट्रमंत्री वू आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधत असताना, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तैवानसाठी 28 कोटी डॉलर्सच्या लष्करी साहित्याचा पुरवठा करण्याची घोषणा केली. यामध्ये अमेरिकेच्या ‘फिल्ड इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन्स सिस्टिम’चा समावेश असून यामुळे कमांड सेंटर्स आणि युद्धभूमीवरील सैनिकांना माहिती पुरविणे सोपे होणार आहे. यामुळे तैवानच्या लष्कराची संपर्क यंत्रणा प्रगत होणार असल्याची घोषणा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने केली. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने तैवानसाठी मंजूर केलेले हे 11 वे शस्त्रसहाय्य आहे.

ट्रम्प प्रशासनाकडून तैवानला दिल्या जाणाऱ्या या शस्त्रसहाय्यावर चीनकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. तैवानला दिलेल्या या शस्त्रसहाय्याला अमेरिका योग्य आणि आवश्‍यक प्रत्युत्तर देईल, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी दिला.

दरम्यान, अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबर नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी चीन उत्सुक असल्याची घोषणा अमेरिकेतील चीनच्या राजदूतांनी केली आहे. पण बायडेन यांच्या तैवानविषयक भूमिकेत बदल होणार नसल्याचे संकेत काही तासांपूर्वीच अमेरिकेने दिले होते.

leave a reply