इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित केल्यानंतर ‘युएई’वरील सायबर हल्ल्यांमध्ये वाढ

- अमिरातीच्या सायबर सुरक्षा प्रमुखांचा आरोप

इस्रायलबरोबर सहकार्यदुबई – आखाती देशांना जैविक महामारीप्रमाणे ‘सायबर पॅन्डेमिक’चाही सामना करावा लागत आहे. या सायबर पॅन्डेमिक अंतर्गत ‘संयुक्त अरब अमिरात’ला (युएई) मोठ्या प्रमाणात सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. एकट्या ‘युएई’वरील वर्षभरातील सायबर हल्ल्यांचे प्रमाण तब्बल 250 टक्क्यांनी वाढले आहेत. इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित केल्यानंतर या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचा आरोप ‘युएई’च्या सायबर सुरक्षेचे प्रमुख ‘मोहम्मद हमाद अल-कुवैती’ यांनी केला. या सायबर हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्यांमध्ये इराण देखील आहे, असे कुवैती यांनी स्पष्ट केले.

दुबईमध्ये आयोजित ‘गल्फ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एक्स्पो अँड कॉन्फरन्स’ (जीआयएसईसी) या सुरक्षाविषयक बैठकीत बोलताना ‘संयुक्त अरब अमिरात’चे (युएई) सायबर सुरक्षा प्रमुख कुवैती यांनी वाढत्या सायबर हल्ल्यांवर लक्ष वेधले. कोरोनाव्हायरसच्या काळात आपले आयुष्य ऑनलाईन व्यवहारांकडे वळले आहे. नेमक्या याच काळात सायबर हल्ल्यांची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढल्याची चिंता कुवैती यांनी व्यक्त केली. तर एकट्या युएईवरील सायबर हल्ल्यांमध्ये किमान 250% ची वाढ झाल्याचे कुवैती यांनी सांगितले.

इस्रायलबरोबर सहकार्य

ऑगस्ट महिन्यात इस्रायलबरोबर औपचारिक पातळीवर सहकार्य प्रस्थापित केल्यानंतर सायबर हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे कुवैती यांनी निदर्शनास आणून दिले. सायबर हल्लेखोरांनी ‘युएई’च्या आर्थिक तसेच आरोग्य क्षेत्राला प्रामुख्याने लक्ष्य केल्याची माहिती कुवैती यांनी दिली. या सायबर हल्ल्यांसाठी वेगवेगळे गट जबाबदार असून यामध्ये इराणचाही समावेश असल्याचे कुवैती या बैठकीत म्हणाले. आर्थिक क्षेत्रातील संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी सदर हल्ले झाल्याचे ‘युएई’च्या सायबर सुरक्षा प्रमुखांनी स्पष्ट केले. इराणने ‘युएई’चे हे आरोप फेटाळले असून आपला देशच सायबर हल्ल्यांचा शिकार असल्याचे इराणने म्हटले आहे.

इस्रायलबरोबर सहकार्ययाआधीही अमेरिका, इस्रायल तसेच आखाती देशांनी इराणवर सायबर हल्ल्याचे आरोप केले होते. काही महिन्यांपूर्वी इराणने इस्रायलच्या जलपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर सायबर हल्ला चढविल्याचा ठपका इस्रायलने ठेवला होता. तर या वर्षाच्या सुरुवातीला सौदीनेही इराणकडून सायबर हल्ल्याची शक्यता वर्तविली होती. सौदीच्या अराम्को इंधन कंपनीवर इराणसंलग्न हॅकर्स सायबर हल्ले चढवू शकतात, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला होता.

इस्रायलबरोबरच्या सहकार्यानंतर युएईवरील सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली असली तरी उभय देशांमधील सहकार्यावर फरक पडणार नसल्याचे युएईने दाखवून दिले आहे. युएई लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ क्षेत्रात इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करणार असल्याची घोषणा ‘युएई’चे ‘एआय’ मंत्री ओमर बिन सुल्तान अल ओलामा यांनी केली. ‘एआय’च्या क्षेत्रात वेगाने प्रगती करीत असलेल्या इस्रायलशी या क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करणे अनिवार्य असल्याचे ओलामा यांनी एका बैठकीत म्हटले आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात इस्रायल आणि युएईमध्ये सहकार्य प्रस्थापित झाल्यानंतर इराणने त्यावर कोरडे ओढले होते. तसेच येत्या काळात युएईला परिणामांना सामोर जावे लागेल, अशी धमकी इराणने दिली होती.

leave a reply