मानवाने परग्रहवाशियांशी संपर्क साधलेला आहे

- इस्रायलचे माजी ‘स्पेस सिक्युरिटी चीफ’ हैम एशेद यांचा दावा

परग्रहवाशियांशी संपर्कतेल अवीव – मानवाने विश्‍वातील परग्रहवासियांशी संपर्क साधलेला आहे. मात्र ही बाब स्वीकारण्यास मानवजात अद्याप तयार नसल्याने ती गोपनीय ठेवण्यात आली आहे, असा खळबळजनक दावा इस्रायलचे माजी ‘स्पेस सिक्युरिटी चीफ’ हैम एशेद यांनी केला. इस्रायली दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत एशेद यांनी हा दावा करतानाच, मंगळ ग्रहावर परग्रहवासियांचा तळ असून त्या तळावर अमेरिकी अंतराळवीरही आहेत, असेही सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ही माहिती उघड करणार होते, पण परग्रहवासियांनी त्यांना रोखले असेही इस्रायलच्या माजी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

इस्रायली दैनिक ‘येदिओत आहरनॉत’ला दिलेल्या मुलाखतीत हैम एशेद यांनी परग्रहवासिय व मानवातील संबंधांबाबत माहिती दिली. ‘परग्रहवासियांनी त्यांच्या अस्तित्त्वाबाबत माहिती पृथ्वीवर जाहीर केली जाऊ नये, असे सांगितले आहे. मानवता अद्यापही त्यासाठी तयार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याबाबतची माहिती उघड करणार होते. मात्र गॅलॅक्टिक फेडरेशनचा भाग असणाऱ्या परग्रहवासियांनी त्यांना थांबवले. पृथ्वीवरील जनतेमध्ये यावरून उन्माद किंवा उद्रेक व्हावा, अशी परग्रहवासियांची इच्छा नाही’, असे एशेद यांनी सांगितले.

परग्रहवाशियांशी संपर्क‘मानवाने अंतराळ व अंतराळयाने हा काय प्रकार आहे, हे नीट समजून घ्यावे आणि त्याबाबत योग्य माहिती घ्यावी. त्यासाठी परग्रहवासिय वाट पहात आहेत. अमेरिका सरकार व परग्रहवासियांमध्ये करारही झाला आहे. पृथ्वीवर प्रयोग करता यावेत म्हणून त्यांनी आपल्याबरोबर कंत्राटावरही स्वाक्षऱ्या केल्या आहेत. परग्रहवासियही संपूर्ण विश्‍वाची जाणीव करून घेण्यासाठी संशोधन करीत आहेत आणि आपण त्यांचे सहाय्यक व्हावे अशी त्यांना वाटते’, असेही स्रायलचे माजी ‘स्पेस सिक्युरिटी चीफ’ एशेद यांनी म्हटले आहे.

परग्रहवाशियांशी संपर्क87 वर्षाच्या एशेद यांनी आपल्या संपूर्ण अनुभवांबाबत ‘द युनिव्हर्स बियाँड द हॉरिझन-कॉन्व्हर्सेशन्स विथ प्रोफेसर हैम एशेद’ नावाचे पुस्तकही प्रसिद्ध केले आहे. आपण ज्या गोष्टी आता सांगत आहोत त्या पाच वर्षांपूर्वी सांगितल्या असत्या तर कदाचित मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असते, असा दावाही त्यांनी केला. मात्र आता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे परग्रहवासियांबाबत बोलले जात असून, माझ्याकडे गमावण्यासारखे काही राहिलेले नाही, या शब्दात आपल्या दाव्यांचे समर्थन केले.

हैम एशेद यांनी 1981 ते 2010 या काळात इस्रायलच्या सिक्युरिटी स्पेस प्रोग्रामचे प्रमुख म्हणून काम पाहिले असून त्यांना तीनवेळा ‘इस्रायल सिक्युरिटी ॲवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे. 2011 साली संरक्षण विभागातून निवृत्त होण्यापूर्वी एशेद यांच्या नेतृत्त्वाखाली इस्रायलकडून जवळपास 20 उपग्रह अंतराळात पाठविण्यात आले होते.

leave a reply