पर्शियन आखातात अनर्थ टळला

पर्शियन आखातात

बगदाद – ऑईल टँकरला सुरूंग लावून पर्शियन आखातात मोठा घातपात घडविण्याचा मोठा कट उधळण्यात आला. गेल्या दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर इराकच्या नौदलाने हा सुरूंग निकामी करून जहाजावरील कर्मचार्‍यांची सुखरूप सुटका केली. या घटनेमुळे आखातातून इंधनाची वाहतूक करणार्‍या जहाजांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. याआधीच गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे या क्षेत्रातील लष्करी हालचाली वाढल्या आहेत.

इराकच्या किनारपट्टीपासून ५२ किलोमीटर अंतरावर आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात उभ्या असलेल्या लायबेरियाच्या ‘एमटी पोला’ या ऑईल टँकरच्या मुख्य भागाला ‘लिंपेट माईन’ अर्थात सुरूंग लावले होते. इराकच्या इंधनवाहू जहाजातून ‘एमटी पोला’मध्ये इंधन भरताना जहाजावरील कर्मचार्‍यांचे याकडे लक्ष गेले. सदर कर्मचार्‍यांनी जहाजाच्या कॅप्टनला हा धोका निदर्शनास आणून दिला. इंधनवाहू जहाजाला सुरूंग लावल्यामुळे काही काळ पर्शियन आखाताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.

पर्शियन आखातात

सागरी लाटांमुळे या जहाजाची होणारी हालचाल सुरूंगाच्या स्फोटाचे कारण ठरले असते. याने अनर्थ झाला असता. त्याचबरोबर पर्शियन आखातात मोठ्या प्रमाणात इंधनगळतीही झाली असती. इराकी लष्कराने तातडीने हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने या जहाजावरील कर्मचार्‍यांची सुटका केली. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी इराकच्या नौदलाने सदर सुरूंग निकामी केले. इराकच्या सुरक्षा यंत्रणांनी ही माहिती दिली. इंधनवाहू जहाजाच्या मोठ्या भागाला सुरूंग लावणे फार अवघड मानले जाते. नौदलातील ‘स्पेशल फोर्सेस’कडे असे सुरूंग लावण्याची क्षमता असते, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. त्यामुळे कुठल्यातरी देशाच्या ‘स्पेशल फोर्सेस’ने किंवा तसे प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनी ‘एमटी पोला’ जहाजावर सुरूंग लावल्याची शक्यता वर्तविली जाते. अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने या कटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

पर्शियन आखातात

गेल्या काही महिन्यांपासून पर्शियन आखात आणि रेड सी’च्या क्षेत्रात इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यांमध्ये तसेच अपहरणांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात रेड सीच्या क्षेत्रात सौदी अरेबियाच्या जेद्दाह बंदरात तैनात असलेल्या इंधनवाहू जहाजावर दहशतवादी हल्ला झाला होता. येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोर यासाठी जबाबदार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तर त्याआधी इराणने पर्शियन आखातातून एका इंधनवाहू जहाजाचे अपहरण केले होते. गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) बंदरात तैनात असलेल्या इंधनवाहू जहाजांवर हल्ले झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या हल्ल्यांसाठी इराण जबाबदार असल्याचा आरोप सौदी व युएईने केला होता.

तर नोव्हेंबर महिन्यात इराणची राजधानी तेहरानमध्ये अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांची हत्या झाल्यानंतर खवळलेल्या इराणने अमेरिका व अमेरिकेला साथ देणार्‍या देशांना धडा शिकविण्याची धमकी दिली. ही धमकी देत असताना इराणने होर्मुझच्या आखातात नौदलाची तैनाती वाढविली आहे. इराणच्या या धमकीनंतर अमेरिकेने पर्शियन आखातात आपली आण्विक पाणबुडी व युद्धनौका रवाना केल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या दीड महिन्यात अमेरिकेने या क्षेत्रात किमान सहा ‘बी-५२एच’ बॉम्बर्स देखील तैनात केले आहेत. मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी ही तैनाती असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले होते.

leave a reply