संशोधकांनी ‘एआय’ तंत्रज्ञान, अंतराळ, सायबर सुरक्षेवर लक्ष केंद्रित करावे

-‘डीआरडीओ’चे प्रमुख सतीश रेड्डी

नवी दिल्ली – पुढील पिढीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासकाकडे संशोधकांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन ‘डीआरडीओ’चे प्रमुख सतीश रेड्डी यांनी केले. ‘डीआरडीओ’च्या ६३ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रेड्डी बोलत होते.

सतीश रेड्डी

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योगांच्या विकासासाठी ‘डीआरडीओ’कडे अफाट क्षमता आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी शैक्षणिक संस्था, संशोधन आणि विकास संस्था, तसेच उद्योगांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे सतीश रेड्डी म्हणाले. याशिवाय संशोधकांनी भविष्यातील गरजांवर लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी आधोरेखित केले. भारताला ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’, अंतराळ, सायबर सुरक्षा या भविष्यातील अत्यंत आवश्यक ठरणार्‍या बाबींकडे संशोधकांना लक्ष पुरवावे लागेल, असे ‘डीआरडीओ’ प्रमुखांनी म्हटले आहे.

‘डीआरआरडीओ’कडून हाती घेण्यात आलेल्या योजनांसाठी देशातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडून (एमएसएमई) सुट्या भागांची निर्यात करण्यात येत असते. मात्र आता हे उद्योग नवीन विकासात भागीदार झाले आहे. दरवर्षी देशातील किमान ३० ‘स्टार्टअप्स’नी संरक्षणदलांसाठी नाविण्यपूर्ण आधुनिक उत्पादनासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. डीआरडीओकडून दिर्घकालीन भागीदारीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे डीआरडीओ प्रमुख रेड्डी म्हणाले.

डीआरडीओने अत्याधुनिक आणि नाविण्यपूर्ण संशोधनकाकडे लक्ष केंद्रित करायला हवे. त्याचबरोबर संशोधनाचे रुपांतर उत्पादनात करणे गरजेचे आहे. तसेच उद्योगांनी हे तंत्रज्ञान मिळवून आवश्यक पायाभूत सुविधांसह बाजारात ते उपलब्ध करायला हवे, असे आवाहनही रेड्डी यांनी केले.

देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. देशाअंतर्गत संरक्षण साहित्याच्या निर्मितीसह निर्यातीवरही भर दिला जात आहे. त्यासाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यात येत आहे. २०२५ सालापर्यंत भारताने सुमारे १.७५ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. नुकतेच आकाश क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. आकाश क्षेपणास्त्रांसाठी ९ देशांनी उत्सुकता दाखविली असून संरक्षण साहित्यांची सर्वाधिक आयात करणारा भारत संरक्षण साहित्याचा निर्यातदार देश म्हणून पुढे येत आहे. या पार्श्‍वभूमीवर रेड्डी यांनी आता पुढील आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देण्याचे संशोधकांना केलेले आवाहन महत्त्वाचे ठरते. दरम्यान, ‘डीआरडीओ’चे प्रमुख रेड्डी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली.

leave a reply