म्युनिक येथील सुरक्षाविषयक परिषदेत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची प्रमुख देशांशी चर्चा

म्युनिक – जर्मनीच्या म्युनिक येथे सुरू असलेल्या सुरक्षा परिषदेत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सहभागी झाले आहेत. या परिषदेदरम्यान त्यांची जर्मनी, रोमानिया, स्लोव्हेनिया, जॉर्जिया, सौदी अरेबिया, इराण, मंगोलिया आणि सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा पार पडली. युक्रेनची समस्या, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडी व अफगाणिस्तानातील परिस्थिती, हे तीन विषय या चर्चेच्या अग्रस्थानी होते. तसेच अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांचीही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची चर्चा पार पडली.

‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स’मध्ये सहभागी झालेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ऍनालेना बेरबॉक यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत रशिया व युक्रेनमधील तणाव तसेच जागतिक हवामानबदल आणि अफगाणिस्तानचा मुद्दा ऐरणीवर होता. काही आठवड्यांपूर्वी भारताच्या भेटीवर आलेल्या जर्मनीच्या नौदलप्रमुखांनी भारत व जर्मनीचे रशियाबाबतचे हितसंबंध एकसमान असल्याचे म्हटले होते. रशियाला चीनच्या अधिक जवळ जाण्यापासून रोखण्यातच भारत व जर्मनीचे हित असल्याचा दावा जर्मन नौदलप्रमुखांनी केला. त्यांच्या या विधानाचे पडसाद उमटले व त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र त्यांच्या या विधानांमुळे भारत व जर्मनीच्या नव्या सरकारची धोरणे एकमेकांना अनुकूल असल्याचे उघड झाले होते.

जर्मनीने पारंपरिक रशियाविरोधी धोरणात बदल घडवून रशियाबरोबर इंधनविषयक सहकार्य प्रस्थापित केले आहे. यावर अमेरिका जहाल प्रतिक्रिया देत आहे. पण युरोपातील इतर सहकारी देशांसह भारताचेही सहकार्य मिळवून जर्मनीचे नवे सरकार अमेरिकेच्या दडपणाचा मुकाबला करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारत व जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये झालेली चर्चा लक्षवेधी ठरते. दरम्यान, सौदीचे परराष्ट्रमंत्री फैजल बिन फरहान अल-सौद यांचीही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भेट घेतली. जागतिक अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांवर सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी सखोल चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.

दोन वर्षांपूर्वी भारत व सौदीमधील धोरणात्मक सहकार्य विकसित करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘स्ट्रेटेजिक पार्टनरशिप काऊन्सिल’च्या कामकाजाचा आढावा या चर्चेत घेण्यात आल्याचे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. सौदीने भारतात १०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. तसेच सौदी भारताबरोबर लष्करी सहकार्य दृढ करण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. काही दिवसांपूर्वी सौदीचे लष्करप्रमुख भारताच्या भेटीवर आले होते.

दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहिया यांच्याशीही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची चर्चा झाली. अमेरिका व इराणमध्ये अणुकरारावर सहमती होत असून यासंदर्भातील माहिती यावेळी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. भारत-इराण आर्थिक सहकार्य व कनेक्टिव्हिटी तसेच अफगाणिस्तानच्या मुद्यावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आपला विचारविनिमय झाल्याचे जयशंकर यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. तसेच रोमानिया, स्लोव्हेनिया, जॉर्जिया, सिंगापूर आणि मंगोलिया या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी जयशंकर यांची चर्चा झाली.

अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरणावर अधिक प्रकाश टाकून याची आपल्याला उद्बोधक माहिती दिल्याचे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

leave a reply