सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी पाच कंपन्यांचे सरकारसमोर दीड लाख कोटींचे प्रस्ताव

नवी दिल्ली – सेमीकंडक्टर क्षेत्रातील पॅकेजिंग, ‘डिस्प्ले फॅब्स’ व ‘कंपाऊंड सेमीकंडक्टर्स’ अशा विविध उद्योगांसाठी पाच कंपन्यांनी भारत सरकारसमोर तब्बल दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव सादर केले आहेत. यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी ‘एचसीएल’चा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच भारतातील ‘वेदांता ग्रुप’ व तैवानच्या ‘फॉक्सकॉन’ कंपनीने सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी करार केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ‘वेदांता’ कंपनीने या क्षेत्रात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते.

स्मार्टफोनपासून ते अंतराळात पाठविण्यात येणार्‍या उपग्रहापर्यंत सर्व क्षेत्रात सेमीकंडक्टरचा वापर होतो. २१व्या शतकात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात तयार होणार्‍या सर्व उत्पादनांमध्ये हा प्रमुख घटक असल्याने सेमीकंडक्टर्सना आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा ‘ब्रेन’ म्हणूनही ओळखले जाते. २०२१ साली जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाची उलाढाल तब्बल ५८३ अब्ज डॉलर्स इतकी होती. भारतातील सेमीकंडक्टर्सची बाजारपेठ १५ अब्ज डॉलर्सहून अधिक असून २०२६ सालापर्यंत ही बाजारपेठ ६३ अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

जागतिक स्तरावरील सेमीकंडक्टर उद्योगाचे वाढते धोरणात्मक महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने गेल्या वर्षी ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ची घोषणा केली होती. याच्या अंतर्गत सेमीकंडक्टर व डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंगसाठी पुढील सहा वर्षांसाठी ७६ हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. तसेच सेमीकंडक्टर क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारत सरकारने आमंत्रित केले होते.

याचा प्रभाव दिसू लागला असून सेमीकंडक्टरच्या भारतातील निर्मितीसाठी काही आघाडीच्या कंपन्या पुढे आल्या आहेत. यामध्ये एसपीईएल सेमीकंडक्टर, एचसीएल, सिरमा टेक्नॉलॉजी, वेलंकिनी इलेक्ट्रॉनिक्स, रतन शा इंटरनॅशनल इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे. भारताची वेदांता व तैवानची कंपनी फॉक्सकॉन यांचा संयुक्त प्रकल्प भारतात उभा राहणार असून याचा करार काही दिवसांपूर्वीच संपन्न झाला होता. त्यामुळे नजिकच्या काळात भारत सेमीकंडक्टरच्या उत्पादनातील आघाडीचा देश म्हणून ओळखला जाऊ शकतो.

या क्षेत्रात भारताला आघाडी मिळाली, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला कुणीही रोखू शकणार नाही. यामुळे प्रतिस्पर्धी देश कमालीचे अस्वस्थ झाल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेनेही सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी मोठी गुंतवणूक जाहीर केली असून चीन याच्या निर्मितीत यश मिळावे यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करीत आहे.

leave a reply