अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसह प्रशासनाला ‘हवाना सिंड्रोम’चा धोका

- माजी सल्लागार बोल्टन यांचा इशारा

बोल्टनवॉशिंग्टन – हवाना सिंड्रोम अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांना निष्क्रिय बनवू शकतो व त्याचे देशाच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनातील अनेक अधिकार्‍यांनी व्हर्टिगो व स्मृतिभ्रंश होण्यासारखे त्रास झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याचा संदर्भ देत माजी सुरक्षा सल्लागारांनी, युद्धाच्या काळात अशी घटना घडल्यास मोठा फटका बसू शकतो, असे बजावले आहे.

अमेरिकेतील ‘सीबीएस’ वृत्तवाहिनीच्या ‘६० मिनिटस्’ या कार्यक्रमात बोलताना बोल्टन यांनी ‘हवाना सिंड्रोम’च्या धोक्याचा उल्लेख केला. ‘आपल्याला हवाना सिंड्रोमचा धोका आहे, याबद्दल ठोस माहिती नाही. पण त्याबाबतचे ठोस उत्तर शोधण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. काहीतरी घडल्यावर तसे प्रयत्न करणे घातक ठरु शकते. युद्धाच्या काळात शत्रूदेशाने हवाना सिंड्रोमचा वापर करून राष्ट्राध्यक्ष, सल्लागार व लष्करी अधिकार्‍यांना निष्प्रभ केले तर अमेरिकेची संपूर्ण सुरक्षा पणाला लागू शकते’, असा इशारा बोल्टन यांनी दिला.

२०१६ साली क्युबाच्या राजधानीत अमेरिका आणि कॅनडाच्या दूतावासातील कर्मचारी ‘हवाना सिंड्रोम’ने बाधित झाल्याचे समोर आले होते. यामध्ये सीआयएच्या एजंट्सचा समावेश असल्याचे उघड झाल्यानंतर हा एक जैविक हल्ला असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. यामागे क्युबा तसेच चीन असल्याची टीका ट्रम्प प्रशासनाने केली होती. यानंतर २०१७ साली वॉशिंग्टनसह युरोप व चीनमधील अमेरिकी दूतावासातील लष्करी तसेच गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी बाधित झाले होते.

बोल्टनबायडेन प्रशासनाने अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्याचबरोबर अमेरिकी एजंट्सवर झालेल्या या हल्ल्यांमागे रशिया असल्याचे आरोप सुरू ठेवले. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला बर्न्स यांनी रशियाचा दौरा करून रशियन गुप्तचर यंत्रणेच्या दोन प्रमुख अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळीही हवाना सिंड्रोम चर्चेचा मुद्दा होता, असा दावा केला जातो.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या अस्पष्ट आरोग्यविषयक घटना असल्याचे म्हटले होते. तर आपल्या एजंट्सच्या मानसिक व शारीरिक प्रकृतीवर आघात करणारे हे हल्ले जैविक हल्ल्याचा भाग असल्याचा आरोप सीआयएने केला होता. २०२० साली प्रसिद्ध झालेल्या अहवालात हवाना सिंड्रोममागे मायक्रोवेव्ह एनर्जीचा हल्ला असल्याचा दावा करण्यात आला होता.

रशिया व चीन दोन्ही देशांवर ‘हवाना सिंड्रोम’वरून आरोप करण्यात आले होते. मात्र दोन्ही देशांनी हे आरोप फेटाळले आहेत.

leave a reply