‘डीआरडीओ’कडून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या ‘क्यूआरसॅम’ची चाचणी

बालासोर – संरक्षण संशोधन विकास संस्थेकडून (डीआरडीओ) ‘क्यूआरसॅम’ या जमिनीवरून हवेतील लक्ष भेदणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. लडाखच्या गलवानमधील संघर्षानंतर जून महिन्यातच ‘क्यूआरसॅम’ क्षेपणास्त्रांची लडाखमध्ये तैनाती करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर ‘क्यूआरसॅम’ची घेण्यात आलेली चाचणी महत्वाची ठरते.

'क्यूआरसॅम'

शुक्रवारी ‘क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल’ची (क्यूआरसॅम) चाचणी ओडिशाच्या बलसोर येथील डीआरडीओच्या तळावरून घेण्यात आली. मोबाईल लॉन्चरच्या सहाय्याने दुपारी साडे तीनच्या सुमारास ही चाचणी पार पडली. यावेळी क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक भेद घेतला. संपूर्णतः भारतीय बनावटीच्या या क्षेपणास्त्रात एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.

या क्षेपणास्त्र यंत्रणेला विशेष रडार यंत्रणेची जोड देण्यात आली आहे. यामुळे हवेत ३० किलोमीटरपर्यंत ‘क्यूआरसॅम’ लक्ष्याच्या अचूक भेद घेऊ शकते. शत्रूची विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्र याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या क्यूआरसॅमला मोबाईल लॉन्चरच्या सहाय्याने डागत येऊ शकत असल्याने हे क्षेपणास्त्र कुठेही सहज वाहून नेता येते. तसेच हे क्षेपणास्त्र कोणत्याही वातावरण आणि कोणत्याही भागातून डागता येऊ शकते.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात या क्षेपणास्त्राच्या युजर चाचण्या पूर्ण झाल्या होत्या आणि २०२१ मध्ये हे क्षेपणास्त्र सरंक्षणदलांच्या ताफ्यात दाखल होईल, असे वृत्त होते. मात्र चीनबरोबरील तणाव वाढल्यावर यावर्षी जून महिन्यात या क्षेपणास्त्रांची तैनाती तातडीने लडाखमध्ये करण्यात आली. त्यामुळे या चाचणीचे महत्व वाढत आहे.

चीनबरोबरील तणाव वाढल्यानंतर विविध क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. १३ हुन अधिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या गेल्या दोन महिन्यात पार पडल्या आहेत. भारतीय संरक्षण दलांसाठी विविध मारक क्षमतेची क्षेपणास्त्रे डीआरडीओकडून विकसित केली जात आहेत. विकसित करण्यात येणारी ही क्षेपणास्त्रे वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. त्यांच्या युजर ट्रायल घेण्यात येत असल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

leave a reply