म्यानमारच्या निवडणुकीत विजयानंतर पंतप्रधानांकडून ‘स्यू की’ यांचे अभिनंदन

नवी दिल्ली – म्यानमारच्या निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या ‘आँग सॅन स्यू की’यांच्या ‘नॅशनल लीग फॉर डेमोक्रॉसी'(एनएलडी) पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्यू की’ यांचे अभिनंदन केले. भारत आणि म्यानमारमधील पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

'स्यू की'

गेल्या रविवारी म्यानमारमध्ये ६४२ जागांसाठी मतदान पार पडले. कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळातही म्यानमारच्या जनतेने मतदानाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. अद्याप मतमोजणी सुरु असून आतापर्यंत ‘स्यू की’ यांच्या पक्षाने ३२२ हून अधिक जागांवर विजय मिळविला आहे. ‘स्यू की’ यांच्या पक्षाचा विजय निश्चित झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरुन ‘स्यू की’ आणि त्यांच्या पक्षाचे अभिनंदन केले. तसेच पुढच्या काळातही भारत आणि म्यानमारचे संबंध दृढ होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

दरम्यान, निवडणुकीच्या महिनाभर आधी भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्यानमारला भेट दिली होती. ईशान्येकडील राज्यांमध्ये म्यानमार सीमेजवळ अतिरेकी संघटनांचा वावर आहे. गेल्या काही दिवसांंपासून भारत आणि म्यानमारचे लष्कर संयुक्तरीत्या या अतिरेक्यांविरोधात आक्रमक कारवाई करीत आहेत. हे सहकार्य अधिक वाढत आहे.

२०१४ पर्यंत म्यानमारमध्ये लष्करी राजवट होती व या काळात म्यानमारवर चीनचा प्रभाव वाढला होता. मात्र गेल्या तीन एक वर्षात म्यानमार चीनच्या प्रभावातून बाहेर आला असून चीनबरोबरील प्रकल्पांमधून म्यानमारने माघार घेऊन चीनला झटका दिला होता. तसेच म्यानमार भारताबरोबरील प्रकल्पांना प्राधान्य देत आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाहीवादी नेत्या ‘स्यू की’ यांचा विजय महत्वाचा ठरतो.

leave a reply