पंजाबमध्ये ड्रोनद्वारे शस्त्र आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे मॉड्युल उद्ध्वस्त

- पाकिस्तान आणि खलिस्तानवाद्यांची लिंक सापडली

नवी दिल्ली – ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानमधून शस्त्र आणि अमली पदार्थांची तस्करी करणारे मॉड्युल पंजाब पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आले असून ‘क्वाडकॉप्टर’, स्कॉर्पिअन कार, पिस्तूल आणि ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणात पाकिस्तान आणि खलिस्तानवाद्यांची लिंक सापडली आहे. भारतात शस्त्र आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानकडून गेल्यावर्षभरात छोट्या ड्रोन्सचा वापर वाढला आहे. पाकिस्तानकडून भारतात शस्त्र तस्करीसाठी ड्रोन्सचा वापर करण्यात येत असल्याचे गेल्यावर्षी पंजाबच्याच तरणतारण भागात काही दहशतवाद्यांच्या अटकेनंतर?पहिल्यांदा उघड झाले होते. त्यानंतर पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानातून ड्रोन्सद्वारे शस्त्रतस्करीच्या कित्येक घटना समोर आल्या होत्या.

तस्करीचे मॉड्युल उद्ध्वस्त

पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पंजाबच्या अमृतसरमधील तहाला साहिब जवळून लखबिर सिंग उर्फ लाखाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत ड्रग्ज आणि अमलीपदार्थांच्या तस्करीसाठी ड्रोन्सचा वापर करीत असल्याचे कबूल केले. सध्या हे ड्रोन्स आपला साथीदार बिच्छिंदर सिंग यांच्या घरी असल्याचा खुलासा त्याने चौकशीत केला. त्यानंतर पोलिसांनी बच्छिंदर सिंग याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या घरातून ड्रोनही जप्त करण्यात आले. पोलिसांना अमली पदार्थाचा साठा आणि .३२ बोरची एक पिस्तूलही जप्त केली आहे.

या दोघांच्या चौकशीत आणखी महत्त्वपूर्ण खूलासे झाले. हे दोघे अमृतसरच्या कारागृहात बंद असलेल्या चार अमली पदार्थ तस्करांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यानंतर कारागृहांची झडती घेतली असता येथून स्मार्टफोन सापडला आहे. याशिवाय पोलीस चौकशीत या प्रकरणाची पाकिस्तान आणि खलिस्तानी लिंक सापडली आहे. लखबिर सिंगचे आंतरराष्ट्रीय तस्करांबरोबरही सपर्क होता, असेही समोर आले आहे.

ड्रोनद्वारे शस्त्रतस्करी आणि अमली पदार्थांची तस्करीच्या कित्येक घटना गेल्या वर्षभरात उघड झाल्या आहेत. पाकिस्तानी दहशतवादी संघटना आणि तस्कर सुरक्षा यंत्रणांना चकविण्याकरीता छोट्या ड्रोन्सचा वापर करीत आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तरणतारणमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. हा शस्त्रसाठा पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पाठविण्यात आल्याचे पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याच्या चौकशीत समोर आले होते. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे अशीच शस्त्रतस्करी करताना सीमेजवळ कोसळलेले एक ड्रोन जप्त करण्यात आले होते. यानंतर अशा अनेक घटना समोर आल्या. ड्रोनच्या संशयीत हालचाली दिसताच ते पाडण्याचे आदेश सीमाक्षेत्रात देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनद्वारे शस्त्रतस्करी करून पाकिस्तान दहशतवाद्यांना शस्त्र पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांचे डाव उधळून लावण्यात येत आहेत.

leave a reply