अरबी समुद्रात इस्रायली जहाजावर ड्रोन्सचे हल्ले

जेरूसलेम – अरबी समुद्रातून प्रवास करणाऱ्या इस्रायलच्या इंधनवाहू टँकरवर ड्रोन्सचे हल्ले झाल्याची माहिती समोर येत आहे. इराणचे ड्रोन्स या हल्ल्यामागे असल्याचा दावा ब्रिटीश पर्शियन वृत्तवाहिनीने केला. इस्फाहन ड्रोन निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर चढविलेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी इराणने हे हल्ले चढविल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

अमेरिकन तसेच क्षेत्रिय लष्करी अधिकाऱ्यांचा हवाला देऊन ब्रिटीश पर्शियन वृत्तवाहिनीने इस्रायली जहाजावर झालेल्या ड्रोन्सच्या हल्ल्यांची माहिती उघड केली. अरबी समुद्रात भारत आणि ओमानच्या सागरी क्षेत्रात असताना हा हल्ला झाला. इस्रायली उद्योजक एयाल ओफर यांच्या मालकीचे ‘कॅम्पो स्क्वेअर’ इंधनवाहू टँकरवर हे ड्रोन्सचे हल्ले झाले. १० फेब्रुवारी रोजी झालेल्या या हल्ल्यामध्ये सदर जहाजाचे नुकसान झाले होते. पण इस्रायलने याची माहिती उघड केली नव्हती.

जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात इराणच्या इस्फाहन ड्रोन्सच्या निर्मिती कारखान्यावर ड्रोन्सचे हल्ले झाले होते. यासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा आरोप इराणने केला होता. तसेच यासाठी इस्रायलचा सूड घेण्याची धमकी इराणने दिली होती. इस्रायली जहाजावर झालेला ड्रोन हल्ला म्हणजे इराणच्या सूडाचा भाग असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

leave a reply