नाईल नदीवरील धरणाच्या मुद्यावर इजिप्त-इथिओपियाचा वाद चिघळला

- इजिप्तकडून इथिओपियन राजदूतांना समन्स

कैरो – नाईल नदीवर बांधण्यात येणार्‍या धरणावरून इथिओपियाच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यावर इजिप्तकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने इथिओपियाच्या राजदूतांना समन्स धाडले असून संपूर्ण खुलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी सुदानने इथिओपियाविरोधात सुरू केलेल्या संघर्षाला इजिप्तची फूस असल्याचे आरोप इथिओपियातून करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता नाईलच्या मुद्यावर इजिप्तविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे या क्षेत्रातील तणाव अधिक चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

इथिओपियाने २०११ साली नाईल नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर इजिप्त व सुदानने तीव्र आक्षेप घेतला. मात्र हे आक्षेप धुडकावून इथिओपियाने धरण उभारण्यास सुरुवात केली होती. ‘द ग्रँड इथिओपियन रेनेसान्स डॅम’ नावाच्या या धरणासाठी ४.६ अब्ज डॉलर्स खर्च येणार असून सध्या धरणाचे जवळपास ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचे मानले जाते. या धरणाचे पाणलोट क्षेत्र १,८७४ किलोमीटर्स इतके प्रचंड असून, त्यात ७४ अब्ज घनमीटर पाण्याचा साठा करण्यात येणार आहे. धरणावर जलविद्युत प्रकल्पही उभारला जात असून त्यातून तब्बल सहा हजार मेगावॅट इतकी ऊर्जानिर्मिती होईल, असे सांगण्यात येते.

इथिओपियाचे धरण पूर्ण होऊन ते पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यास इजिप्त व सुदानला त्याचा जबरदस्त फटका बसेल, असा दावा दोन्ही देशांकडून करण्यात येतो. इजिप्तची जवळपास ९० टक्के शेती नाईल नदीच्या पाण्यावर अवलंबून असून इथिओपियाच्या धरणामुळे एक तृतियांश शेती धोक्यात येऊ शकते, असे इजिप्तने म्हटले आहे. सुदानमध्ये शेतीला फटका बसण्याबरोबरच जनतेला मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात या देशांनी धरणाला असलेला विरोध अधिक तीव्र केला आहे. इथिओपियाने लेखी करार करून नदीच्या पाण्याचा प्रवाह कायम राहिल, याची हमी द्यावी अशी मागणी केली आहे.

मात्र गेले दशकभर सुरू असलेल्या चर्चेनंतरही इथिओपियाने लेखी हमी देण्याची तयारी दर्शविलेली नाही. त्यामुळे इजिप्त व सुदान अधिक आक्रमक झाले आहेत. इजिप्त व सुदानच्या या भूमिकेवर इथिओपियाच्या परराष्ट्र विभागाकडून प्रतिक्रिया उमटली. ‘इथिओपियातील धरणामुळे आपल्याला काहीच धोका नाही हे इजिप्त व सुदान या दोन्ही देशांना माहित आहे. मात्र ते देशांतर्गत समस्यांपासून लक्ष वळविण्यासाठी धरणाच्या मुद्याचा वापर करीत आहेत. इजिप्त व सुदानच्या राजवटींसमोर अनेक अंतर्गत गंभीर मुद्दे असून त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो. विशेषतः इजिप्तमध्ये अनेक मुद्यांवर परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे जनतेला विचलित करण्यासाठी धरणाचा मुद्दा वापरला जात आहे’, असा आरोप इथिओपियाच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते दिना मुफ्ती यांनी केला.

मुफ्ती यांचे या विधानावर इजिप्तने तीव्र नाराजी व्यक्त केली. सदर वक्तव्य इजिप्तवरील हल्ला असून इथिओपियन राजवट त्यांचे अपयश लपविण्यासाठी अशी बडबड करीत आहे, असा टोला इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगावला. या टीकेपाठोपाठ इथिओपियाच्या राजदूतांना समन्स धाडून इजिप्तने वक्तव्य गांभीर्याने घेतल्याचे संकेत दिले आहेत. या वर्षात धरणाच्या मुद्यावर तिन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चा अपयशी ठरल्या आहेत. त्याचवेळी तिगरे प्रांतातील कारवाईवरून इथिओपियाचे सरकार सध्या अडचणीत आले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरून त्यांना जबरदस्त टीका सहन करावी लागत आहे.

ही बाब लक्षात घेऊन इजिप्तने सुदानच्या सहाय्याने इथिओपियावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी गेल्या काही महिन्यात सुदानबरोबरील राजनैतिक व लष्करी सहकार्य बळकट करण्यावरही इजिप्तने भर दिल्याचे समोर आले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर इथिओपियातील धरणाचा मुद्दा आफ्रिकेत नव्या संघर्षाची सुरुवात ठरु शकते, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply