आफ्रिकेत मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू

- जगातील सर्वात मोठा व्यापारी करार असल्याचा दावा

अ‍ॅक्रा/वॉशिंग्टन – एबोला व कोरोनासारख्या जीवघेण्या साथी, दहशतवाद व वांशिक संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर १ जानेवारी, २०२१पासून आफ्रिका खंडात मुक्त व्यापारी कराराची अंमलबजावणी सुरू झाली. ‘आफ्रिकन काँटिनेंटल फ्री ट्रेड एरिआ हा फक्त व्यापारी करार नाही तर आफ्रिका खंडाच्या विकासाचे प्रमुख साधन आहे’, या शब्दात वरिष्ठ अधिकारी वॅमकेले मेने यांनी करार सक्रिय झाल्याची घोषणा केली. जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेनंतरचा सर्वात मोठा मुक्त व्यापारी करार म्हणून ओळखण्यात येणार्‍या या करारात आफ्रिका खंडातील ५४ देशांचा सहभाग आहे.

आफ्रिकी देशांची शिखर संघटना म्हणून ओळखण्यात येणार्‍या आफ्रिकी महासंघाने २००२ साली खंडातील सर्व देशांमध्ये ‘मुक्त व्यापारी करारा’ची संकल्पना मांडली होती. त्यानंतर २०१३ साली या कराराची प्राथमिक योजना समोर आली होती. २०१५ ते २०१८ मध्ये झालेल्या विविध बैठकांमधून आफ्रिकेतील सर्व देशांचा सहभाग असणार्‍या मुक्त व्यापार कराराचा मसुदा तयार करण्यात आला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात रवांडात झालेल्या बैठकीत ४४ देशांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या.

१२० कोटींहून अधिक लोकसंख्या व तीन ट्रिलियन डॉलर्स ‘जीडीपी’ अशी व्याप्ती असणारा हा करार आफ्रिका खंडाच्या आर्थिक विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मानले जाते. करारानुसार सर्व आफ्रिकी देशांनी परस्परांच्या उत्पादनावरील कर ९० टक्क्यांनी कमी करायचा असून सेवा तसेच मालाची मुक्त वाहतूक कराराच्या केंद्रस्थानी आहे. मात्र आफ्रिकी देशांमधील मतभेद व वांशिक संघर्षामुळे या करारावर सातत्याने प्रश्‍नचिन्ह उभे करण्यात येत होते. इरिट्रिआ या देशाने करारात सामील होण्यास नकार दिला असून, उर्वरित ५४ देशांपैकी ३४ देशांनी कराराला कायदेशीर मंजुरी दिली आहे.

आफ्रिकी देशांमधील व्यापाराच्या नव्या युगाला सुरुवात होत आहे, या शब्दात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी नव्या कराराचे स्वागत केले. तर हा करार आफ्रिका खंडाने ‘युनायटेड आफ्रिके’चे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असून, जागतिक पातळीवर आर्थिक सत्ता बनण्यासाठी एकत्र येणे हा निर्णायक टप्पा ठरतो, या शब्दात केनियाचे संसद सदस्य व संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी अधिकारी युसुफ हसन यांनी कराराची प्रशंसा केली आहे. कच्च्या मालाचा निर्यातदार या वसाहतवादी आर्थिक रचनेपासून आफ्रिकेला मुक्त करण्यासाठी करार मोलाचे योगदान देईल, असे वरिष्ठ अधिकारी वॅमकेले मेने यांनी म्हटले आहे.

वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, आफ्रिका मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत ७६ अब्ज डॉलर्सची भर पडू शकते. तर संयुक्त राष्ट्रसंघटनेने, या व्यापारी करारामुळे आफ्रिकेतील अंतर्गत व्यापार ५० टक्क्यांहून अधिक वाढेल, असे भाकित वर्तविले आहे.

leave a reply