सिरियातील अमेरिकेच्या तळावर कामिकाझे ड्रोन्सचे हल्ले

दमास्कस – सिरियाच्या अल-तन्फ येथे तळ ठोकणाऱ्या अमेरिकेच्या लष्करावर कामिकाझे अर्थात आत्मघाती ड्रोन्सनी हल्ले चढविले. यामध्ये अमेरिकेशी संलग्न असलेल्या सिरियन गटाचे दोन बंडखोर जखमी झाले आहेत. अमेरिकेने सिरियातील सैन्यतैनाती वाढविण्याची घोषणा केल्यानंतर येथील लष्करी तळावरील हा पहिला हल्ला ठरतो. या ड्रोन हल्ल्यांसाठी इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवर संशय व्यक्त केला जातो.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्यमाघार घोषित केल्यानंतर सिरियाच्या अल-तन्फ तळावर सुमारे ९०० जवान तैनात ठेवले होते. सिरियातील आयएसविरोधी युद्ध संपल्याची घोषणा करून पुढच्या काळात हे लष्करही माघारी बोलाविण्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. पण अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलानंतर सिरियातील सैन्यमाघारीचा मुद्दा लांबणीवर पडला होता. काही आठवड्यांपूर्वीच अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने सिरियातील आयएसचा धोका वाढत असल्याचे जाहीर करून सिरियात नव्याने सैन्यतैनाती करण्याची घोषणा केली होती.

इराक व जॉर्डनच्या सीमेजवळ असलेल्या अल-तन्फ या लष्करी तळावर ही तैनाती होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. अशा परिस्थितीत, सिरियातील याच लष्करी तळावर तीन ड्रोन्सचे हल्ले झाले. यातील दोन ड्रोन्स भेदण्यात यश मिळाल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांड-सेंटकॉमने दिली. तर तिसऱ्या ड्रोन हल्ल्यात सदर लष्करी तळावर तैनात अमेरिका संलग्न सिरियन बंडखोर गटाचे दोन जण जखमी झाल्याचे सेंटकॉमचे प्रवक्ते जो बुशिनो यांनी सांगितले.

या ड्रोन हल्ल्यांमुळे अमेरिकेचे जवान व सहकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आल्याची टीका सेंटकॉमने केली. तसेच याप्रकारचे ड्रोन हल्ले खपवून घेणार नसल्याचे सेंटकॉमच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. पण या ड्रोन हल्ल्यांसाठी थेट कुणावरही आरोप करण्याचे सेंटकॉमच्या प्रमुखांनी टाळले. अल-तन्फ या लष्करी तळापासून काही अंतरावर इराणसंलग्न दहशतवादी तैनात आहेत. तर आयएसशी संलग्न असलेले स्लिपर सेल्सचे दहशतवादी देखील याच तळाच्या आसपास दबा धरून असल्याचा दावा केला जातो.

leave a reply