तुर्की-सिरियाच्या सीमेवरील नव्या भूकंपात आठ बळी

भूकंपातील एकूण बळींची संख्या ४७ हजारांच्या पलिकडे

Turkish-Syria borderअंकारा – सोमवारी तुर्की-सिरियाच्या सीमेजवळ ६.४ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाने दिलेल्या हादऱ्यात आठ जणांचा बळी गेला तर ३०० जण जखमी झाले. तुर्कीचे अंताक्या शहर या भूकंपाचे केंद्र होते. दोन आठवड्यांपूर्वी तुर्की-सिरियात आलेल्या प्रलयंकारी भूकंपातील बळींची संख्या ४७ हजारांवर गेली असून यामध्ये भयावह वाढ होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

दोन आठवड्यांपूर्वी तुर्की व सिरियाला ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाने हादरवून सोडले होते. त्यानंतर तुर्कीमध्ये छोट्या-मोठ्या तीव्रतेचे शेकडो हादरे बसल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. यामुळे भूकंपग्रस्तांपर्यंत सहाय्य पोहोचण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा दावा केला जातो. एकट्या तुर्कीमधील बळींची संख्या ४२ हजारांहून अधिक असल्याचे यंत्रणांचे म्हणणे आहे. अजूनही काही भागातील इमारतींचा ढिगारा उपसलेला नसून बळींची संख्या ५० हजारांवर पोहोचण्याची भीती संयुक्त राष्ट्रसंघाने वर्तविली होती. तुर्कीतील मदतकार्य पुढील काही महिने सुरूच राहील, एवढी मोठी हानी या भूकंपाने केल्याचा दावा केला जातो. तुर्कीच्या दक्षिणेकडचे प्रांत या भूकंपामुळे काही वर्षे मागे गेली आहेत. या भूकंपग्रस्तांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

leave a reply