रशियन अर्थव्यवस्थेत दोन टक्क्यांची घट

मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे रशियन अर्थव्यवस्थेत मोठी घसरण होईल, असे दावे पाश्चिमात्य नेते व विश्लेषकांनी केले होते. मात्र प्रत्यक्षात रशियन अर्थव्यवस्था दोन टक्क्यांनी घसरल्याची महत्त्वपूर्ण माहिती ‘रोसॅट’ या यंत्रणेने दिली आहे.

Russian economyमंगळवारी रशियन यंत्रणेने २०२२ सालची आर्थिक आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, रशियन जीडीपीमध्ये २०२१ सालच्या तुलनेत २.१ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र इंधनाच्या दरांमध्ये झालेली मोठी वाढ व संरक्षणक्षेत्रावरील खर्च यामुळे रशियन अर्थव्यवस्थेला आधार व चालना मिळाल्याचे यात नमूद करण्यात आले.

गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियन अर्थव्यवस्था ५० टक्क्यांनी कमी झालेली दिसेल, असे वक्तव्य केले होते. तर आंतरराष्ट्रीय गटांनी १० ते १५ टक्क्यांच्या घसरणीचा अंदाज वर्तविला होता.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनीत झालेल्या स्फोटांच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेत चर्चा होणार आहे. रशियाने यासंदर्भात मागणी केली होती. नॉर्ड स्ट्रीम इंधनवाहिनीमध्ये झालेल्या स्फोटावरून रशिया व पाश्चिमात्य देशांनी परस्परांवर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाने स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

leave a reply